मुंबई: #MeToo या चळवळीला भारतात उधाण आलं ते म्हणजे अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर. २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला होता. तिच्या या आरोपांनंतर हे प्रकरण बरंच पेटलं आणि दर दिवशी त्याला नवी वळणं मिळू लागली.
चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नानांची आपल्याप्रती असणारी वागणूक चुकीची असून त्यांनी गाण्यातही काही इंटिमेट स्टेप्सची मागणी केल्याचा आरोप तिने केला.
नानांवर केलेल्या या आरोपांनंतर तनुश्रीने त्या चित्रपटाच्या सेटवरुन काढता पाय घेतला. ज्यानंतर अभिनेत्री, 'आयटम गर्ल' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राखी सावंत हिच्यावर ते गाणं चित्रीत करण्यात आलं होतं.
जवळपास दहा वर्षांनी तनुश्रीने एका मुलाखतीत नानांविरुद्ध आवाज उठवल्यानंतर ती हे सर्वकाही प्रसिद्धीसाठी करत असल्याचं राखी सावंतने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं.
राखीच्या या वक्तव्यानंतर आता तनुश्रीने तिच्यावर दहा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्याचं कळत आहे. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनीच याविषयीची माहिती दिली.
'माझ्या अशीलाची प्रतिमा मलिन केल्यामुळे राखी सावंत हिच्यावर आम्ही दहा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे', असं ते म्हणाले.
राखीने या दाव्यावर आता काही उत्तर दिलं नाही तर तिला दोन वर्षांसाठी शिक्षा होऊ शकते असा इशाराही तनुश्रीच्या वकिलांनी दिला आहे.
नानांवर तनुश्रीने केलेल्या आरोपांनतर, 'तिला वेड लागलं आहे का?', असा प्रश्न राखीने उपस्थित केला होता. दहा वर्षांनंतर आपल्या खात्यातील पैसे संपले असल्यामुळे आता ही तनुश्री दत्ता भारतात परतली असून नाना पाटेकर यांच्यावर चुकीचे आरोप करत आहे. ती करत असलेल्या आरोपांपैकी काहीच त्या सेटवर घडलं नव्हतं. असं वक्तव्य राखीने केलं होतं.
राखीने सदर प्रकरणी आवेगात आपली प्रतिक्रिया दमली खरी. पण, आता मात्र हे प्रकरण तिला चांगलच भोवण्याची चिन्हं दिसत आहेत.