वाढदिवसाच्या निमित्ताने खिलाडी कुमारची मोठी घोषणा

जाणून घ्या याविषयीची अधिक माहिती 

Updated: Sep 10, 2019, 08:58 AM IST
वाढदिवसाच्या निमित्ताने खिलाडी कुमारची मोठी घोषणा
अक्षय कुमार

मुंबई : बॉलिवूडचा 'खिलाडी कुमार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अक्षय कुमार याची प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट ही चाहत्यांना अत्यंत महत्त्वाचे संदेश देणारी आणि महत्त्वाच्या घोषणा करण्याविषयीची असते. अशीच एक पोस्ट त्याने नुकतीच शेअरही केली. ९ सप्टेंबर, म्हणजेच वाढदिवसाच्या निमित्ताने खुद्द खिलाडी कुमारनेच चाहत्यांना एक खास भेट दिली. जे पाहता येत्या काळात अक्षयच्या पाच मोठ्या चित्रपटांच्या रांगेत आता सहाव्या, चित्रपटाचीही भर पडली आहे हेच स्पष्ट होत आहे. 

मोठ्या अनोख्या अंदाजात खिलाडी कुमारने ही पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली. कारण, ही पोस्ट आहे त्याच्या आगामी चित्रपटाविषयीची. 'पृथ्वीराज', असं त्याच्या पुढील चित्रपटाचं  नाव आहे. ज्यामध्ये अक्षय, मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. ज्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर पाहता चित्रपटाची भव्यता लक्षात येत आहे. 

'वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या पहिल्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यास मला आनंद होत आहे', असं लिहित त्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारण्याचा आनंद त्याने व्यक्त केला. यशराज फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचं एकंदर कथानक पाहता त्याविषयीची उत्सुकता आतापासूनच पाहायला मिळत आहे. 

मुख्य म्हणजे चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय कुमारचं चित्रपटातील रूप पाहता येत नाही आहे. त्यामुळे याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २०२० मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीची दिवाळी ही सिनेरसिकांसाठी परवणी असणार आहे, हे खरं.