मुंबई : 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वीच सर्जिकल स्ट्राईकचा तो थरारक प्रसंग रुपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता आला होता. २०१६ मध्ये झालेल्या उरी हल्ल्याचा विसर पडत नाही तोच गुरुवारी जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरा येथे दहशतवाद्यांनी एक आत्मघाती हल्ला घडवून आणला. या हल्ल्याचा तीव्र निषेध सर्वच स्तरांतून व्यक्त केला गेला. कलाविश्वावरही आता याचे पडसाद उठतना दिसत आहेत.
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तामधील एका कार्यक्रमास जाण्यास नकार दिल्यानंतर 'उरी' फेम अभिनेत्यानेही त्यांच्या या निर्णयाला दुजोरा दिला आहे. 'उरी...' या चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेता मोहित रैना याने कलाविश्वातील वरिष्ठांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. 'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 'सध्या एक देश म्हणून आपण एकसंध राहणं अतिशय गरजेचं आहे. शहीदांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होत त्यांना धीर देणं महत्त्वाचं आहे. सरकार आणि संरक्षण यंत्रणा या हल्ल्याचं उत्तर कसं द्यायचं याविषयी योग्य ती पावलं उचलतीलच असं तो म्हणाला. पाकिस्तानी कलाकारांच्या भारतातील बंदीचंही त्याने समर्थन केलं.
फक्त मोहित रैनाच नव्हे, तर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध करत तीव्र शब्दांमध्ये या कृत्याची निंदा केली आहे. सीआरपीएफच्या ४० जवानांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागलेल्या या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देण्यात यावं अशीच संतप्त प्रतिक्रिया सध्या सर्व स्तरांतून पाहायला मिळत आहे. ज्याचे थेट पडसाद आता कलाक्षेत्र आणि भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संबंधांवरही झाल्याचं पाहायला मिळत आहे.