वेब सीरिज विश्वातील 'या' अभिनेत्याला हॉलिवूडची लॉटरी

जाणून घ्या तो आहे तरी कोण? 

Updated: Feb 9, 2019, 12:59 PM IST
वेब सीरिज विश्वातील 'या' अभिनेत्याला हॉलिवूडची लॉटरी  title=

मुंबई : चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडणाऱ्या एका अभिनेत्याला चक्क हॉलिवूडमध्ये काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. ही संधी त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचं वळण ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे. तो अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. 

'न्यूटन', 'मिर्झापूर', 'बरेली की बर्फी', 'स्त्री' या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या पंकज त्रिपाठीला लवकरच ख्रिस हेमम्सवर्थ या अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. 'अॅव्हेंजर्स ऑफ द मार्व्हल युनिवर्स'मधील 'थॉर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या पंकजच्या आगामी प्रोजेक्टविषयी कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

ख्रिस मागच्या वर्षी म्हणजेच २०१८च्या नोव्हेंबर महिन्यात 'ढाका' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात होता. दिग्दर्शक सॅम हारग्रेव्ह याच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणी करण्यात आलं होतं. पंकज त्रिपाठीसोबतच या चित्रपटात रणदीप हुडा आणि मनोज वाजपेयी हे कलाकारही झळकणार आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँकॉकमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना पंकज चित्रपटाच्या टीममध्ये सहभागी होणार असून, त्याच्या भागाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. ज्यानंतर चित्रपटाच्या उर्वरित भागाचं चित्रीकरण थायलंडमध्ये करण्यात येणार आहे. 'ढाका' हा एक थरारपट असल्याचं म्हटलं जात असून, नेटफ्लिक्सवरच हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.