मुंबई : येत्या काळात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, एका सुवर्ण संचयनी योजनेमध्ये आपली फसवणुक झाल्याचा आरोप करत तिच्या आणि तिच्या पतीविरोधात एका गुंतवणुकदाराने तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी पोलिसांकडून याविषयीची माहिती देण्यात आली.
सचिन जोशी असं अनिवासी भारतीय अर्थात या एनआरआय तक्रारदारांचं नाव आहे. ज्यांनी खार पोलीसांकडे याप्रकरणीची तक्रार दाखल केली. Satyug Gold Pvt Ltd या कंपनीकडून आपली फसवणुक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्याचं प्रमुखपद एकेकाळी शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याकडे होतं.
जोशी यांच्या तक्रारीत नमुद केल्यानुसार, त्यांनी १८.५८ लाख रुपये किंमतीचं सोनं या कंपनीकडून खरेदी केलं होतं. एका सुवर्णसंचयनी योजनेअंतर्गत २०१४मध्ये त्यांनी हा व्यवहार केला होता. पाच वर्षांच्या योजनेअंतर्गत खरेदीदारांना सवलतीच्या दरात 'गोल्ड कार्ड' देण्यात आलं. शिवाय योजनेच्या अखेरीत काही प्रमाणात सोनंही त्यांना या योजनेतून काढता येणार असल्याची हमी देण्यात आली होती.
फसवणुकीच्या या प्रकरणी अधिकाऱ्यांचा हवाला देत 'एनडीटीव्ही'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार २५ मार्च, २०१९ला जोशी यांची ही योजना संपुष्टात आली. त्याचवेळी जेव्हा त्यांनी 'गोल्ड कार्ड'च्या सहाय्याने सोनं काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा वांद्रे- कुर्ला संकुल येथे असणाऱ्या या कंपनीला टाळं लागल्याचं लक्षात आलं. पुढे तक्रारदारांच्या असं लक्षात आलं की शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांनीही अनुक्रमे मार्च २०१६ आणि नोव्हेंबर २०१७ मध्ये या कंपनीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला.
आपली फसवणुक झाल्याचं लक्षात येताच जोशी यांनी याप्रकरणीची तक्रार दाखल केली. दरम्यान, अद्यापही यासंबंधीची एफआयआर दाखल झालेली नसून तपास सुरु आहे.