मुंबई : लहान मुलं म्हटलं की किलबिल, धम्माल मस्ती, दंगा असे माकडचाळे ओघाने आले, त्या शिवाय कोणाचेही बालपण पूर्ण होत नाही. मात्र अलीकडे इंटरनेटच्या आभासी जाळ्यात मुले अडकत चालली आहेत. यामुळेच काही वर्षापूर्वी पर्यंत लहान मुलांच्या शाळानां सुट्टया लागल्या की बालनाट्य, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चार्ली चॅप्लिन, लॉरेल अँड हार्डी, चंपक,मोगली अशा पात्रांची मुलांना भुरळ पडलेली असायची ती आता दिसत नाही.
मराठी मध्ये मागील काही वर्षात मुलांसाठी म्हणून बालचित्रपट सुद्धा आलेला नाही. ती उणीव लेखक – दिग्दर्शक विजू माने यांनी ‘मंकी बात’मधून भरून काढल्याचे या चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून दिसते. डार्विनचा सिद्धांत उलटा होणार, माणसाचं पुन्हा माकड होणार. अशी हटके पंचलाईन असलेल्या मोशन पोस्टरमुळे ‘मंकी बात’ बद्दल सर्वांच्याच मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे लहान मुलांनीच लहान मुलांसाठी हा चित्रपट तयार केला आहे.
निष्ठा प्रॉडक्शन्सच्या ‘मंकी बात’ या बालचित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन विजू माने यांचे असून संवाद आणि गीते संदीप खरे यांनी लिहिली आहेत. लहान मुलांच्या खोडकर स्वभावाला साजेसं,बालपणाच्या माकडचाळ्यांना प्रोत्साहित करणारे धमाल असे संगीत डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिले आहे. आकाश पेंढारकर आणि विनोद सातव प्रस्तुत ‘मंकीबात’ची निर्मिती विवेक डी., रश्मी करंबेकर, मंदार टिल्लू आणि विजू माने यांनी केली आहे. हा बालचित्रपट येत्या १८ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.