मंगळसुत्र गळ्यात नाही तर हातात का घालतात? अमृता फडणवीसांनी केला खुलासा

अमृता यांनी 'बस बाई बस या' शोमध्ये हा खुलासा केला. 

Updated: Aug 5, 2022, 06:53 AM IST
मंगळसुत्र गळ्यात नाही तर हातात का घालतात? अमृता फडणवीसांनी केला खुलासा title=

मुंबई : ‘झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. अमृता यांनी या भागात बऱ्याच गोष्टी शेअर केल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे. 

अमृता नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांना गाण्याची आवड असून त्यांचं नवं गाणं नुकतंच भेटीला आलं आहे. अमृता यांच्या बऱ्याच वक्तव्यांनी सुद्धा त्यांना प्रकाशझोतात आणलं आहे. एकंदरच कार्यक्रमाचा प्रोमो बघून एपिसोड धमाल आणि रंजक असणार असा संकेत मिळत आहे.

या भागात अमृता फडणवीस एका खास गोष्टीचा खुलासा करताना दिसणार आहे. प्रेक्षक महिला आलेल्या सेलिब्रेटी पाहुणीला भन्नाट प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात. अमृता यांना सुद्धा एक महिला गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई बोलतात का असा प्रश्न विचारताना दिसत आहेत.

त्यावर अमृता उत्तर देत बोलतात, 'मंगळसूत्र म्हणजे नवरा अर्थात सौभाग्याचं निशाण असतं. पण मला असं वाटतं की आपल्या पतीनं आपला गळा पकडण्यापेक्षा हातात हात दिलेला कधीही चांगला, म्हणून मी कायम हातात मंगळसूत्र घालते, म्हणजे मला नेहमी वाटत की देवेंद्र माझ्यासोबत आहेत आणि आम्ही एकमेकांचा हात धरून ठेवला आहे. जसा अनेकांचा गळा पकडला असतो तर गळ्याला फास बसण्यापेक्षा हातात हात कधीही छान.'

याशिवाय एका प्रोमोमध्ये देवेंद्र आणि अमृता यांच्यातला एक खट्याळ संवाद सुद्धा बघायला मिळणार आहे. देवेंद्र यांच्या फोटोशी संवाद साधताना त्या म्हणतात, 'अरे वा! आज वेळ मिळाला वाटतं. कुठे नेताय फिरायला? आसाम ला?' मागच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमध्ये आसाम, गुवाहाटी, सुरत अशी अनेक शहरं जोडली गेली होती. त्याचा संदर्भ लावत अमृता जबरदस्त उत्तर देताना दिसत आहेत.'