मुंबई : ओम राऊतच्या दिग्दर्शनात साकारण्यात आलेल्या 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दर दिवसाआड एक नवी उंची गाठत आहेत. चित्रपटाच्या वाट्याला आलेलं यश आणि कलाकारांना मिळणारा प्रतिसाद पाहता काही राज्यांमध्ये या चित्रपटाच्या अनुशंगाने राज्य प्रशासनाने महत्वाची पावलं उचलली आहेत. ज्याअंतर्गत हा चित्रपट करमुक्त अर्थात टॅक्स फ्री म्हणून घोषित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही अजय देवगनची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या विरोधी पक्षनेतेपदी असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे.
'तान्हाजी' या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यात यावं अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर आता राज्य शासनाकडून कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Former Chief Minister Devendra Fadnavis has written a letter to Chief Minister Uddhav Thackeray demanding to make Ajay Devgan starrer film 'Tanhaji' tax free in the state. pic.twitter.com/GPKjqTsfFN
— ANI (@ANI) January 15, 2020
दरम्यान, विक्रमी कमाईचे आकडे ओलांडणारा 'तान्हाजी....' हा चित्रपट आता शंभर कोटींचा आकडाही सहजपणे पार करेल. मेघना गुलजार दिग्दर्शित आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असणाऱ्या 'छपाक' या चित्रपटाचं आव्हान असतानाही 'तान्हाजी'ने मात्र या स्पर्धेत चांगलीच पकड मिळवल्याचं पाहायला मिळत आहे.
वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
काजोल, अजय देवगन, शरद केळकर, देवदत्त नागे या आणि अशा अनेक कलाकारांच्या मेहनतीतून 'तान्हाजी' हा चित्रपट साकारण्यात आला आहे. स्वराज्याचा भक्कम पाया रचत त्यासाठी मर्द मावळ्यांना एकत्रित आणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांची एक साहसगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. सत्यघटनेवर आधारलेलं या चित्रपटाचं कथानक आणि त्यातील साहसदृश्य या चित्रपटाच्या जमेची बाजू ठरत आहेत.