close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बॉलिवूड अभिनेत्याला विमानतळावर मुलीच्या नावाने हाक मारली अन्.....

त्याला एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं... 

Updated: Sep 8, 2019, 10:34 AM IST
बॉलिवूड अभिनेत्याला विमानतळावर मुलीच्या नावाने हाक मारली अन्.....
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : प्रेक्षकांची सातत्याने दाद मिळवत त्यांच्या मनात कायमचं घर करणाऱ्या कलाकारांमध्ये सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्याचा समावेश आहे. कायमच विविध धाटणीच्या भूमिका साकारण्याला त्या अभिनेत्याने प्रयत्न केला आहे. मुख्य म्हणजे त्याच्या या बहुविध भूमिकांना कायमच कलाविश्वातूनही शाबासकी मिळाली. अशा या अभिनेत्याला नुकतच एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. 

मुंबई विमानतळावर एका अनपेक्षित प्रसंगाचा सामना करणारा हा अभिनेता आहे, आयुषमान खुराना. सध्याच्या घडीला 'ड्रीमगर्ल' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असणाऱ्या आयुषमानला मुंबई विमानतळावर चक्क 'पूजा' या नावाने संबोधण्यात आलं. चित्रपटात आयुषमान ज्या मुलीच्या आवाजात बोलताना दिसणार आहे, त्या 'पूजा'चं नाव घेत त्याला प्रशंसकाने त्याच नावाने हाक मारली. त्याच्यासाठीही हा प्रसंग पूर्णपणे अनपेक्षित होता. मुख्य म्हणजे यावरुन आयुषमानच्या आगामी चित्रपटाविषयी असणारी उत्सुकता स्पष्ट होत आहे. 

काही दिवसांपूर्वीच आयुषमानच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यामध्ये एका हटके आणि तितक्याच कुतूहलपूर्ण कथानकाची हलकीशी झलकही पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे आयुषमानला स्त्रीरुपात पाहणंही चाहत्यांसाठी परवणी ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

आय़ुषमान व्यतिरिक्त अन्नू कपूर, विजय राज, मनजोत सिंग, निधी बिष्ट, राजेश शर्मा, अभिषेक बॅनर्जी, राज भन्साळी हे कलाकारही 'ड्रीमगर्ल'मधून झळकणार आहेत. बालाजी टेलिफिल्म्सची निर्मिती असणारा हा चित्रपट १३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.