जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई : या विकेन्डला आपल्या भेटीला आलाय अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित 'काय रे रास्कला' हा सिनेमा... गिरीधन स्वामी दिग्दर्शित 'काय रे रास्कला' या सिनेमाची टॅगलाईनच आहे हसा आणि फसा... हसण्याबद्दल तर माहीत नाही पण हा सिनेमा बघून तुमची नक्कीच फसवणूक होणार आहे यात शंका नाही..
दाक्षिणात्य सिनेमातला मसाला, तिथलं अवास्तव जग, तिथली टिपिकल स्टाईल, टिपिकल फ्लेवर्स 'काय रे रास्कला' या सिनेमात तुम्हाला पहाला मिळणार आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रानं तिच्या पहिल्या मराठी सिनेमासाठी 'व्हेंटिलेटर' या सिनेमाची निवड केली तर दुसऱ्या सिनेमासाठी चक्क 'काय रे रास्कला?' कशाला? हा प्रश्न सिनेमा पाहताना सतत पडतो.
राजा या बिन्धास्त, चलाख, नोकरीधंदा न करुन केवळ लोकांना फसवूण पैसे कमावणाऱ्या तरुणाची ही गोष्ट आहे. सुरुवातीला छोटे मोठे छोल करुन हा आपला गुजारा करतो. नंतर एक मोठा डाव मारण्याचा प्रयत्न तो करतो. एका बिजनेसमन आणि राजकारणीला फसवण्याचा कट तो रचतो... या प्रयत्नात त्याची साथ देतोय या सिनेमातला बालकलाकार नीहार गीते.. पुढे काय घडतं यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल.
'काय रे रास्कला' या सिनेमाची कथा, पटकथा सगळीच बोंब आहे. हा सिनेमा म्हणजे नुसता गोंधळ... अभिनेता निखिल रत्नपारखीचा अभिनय सोडला तर या सिनेमात पाहण्यासारखं काहीच नाही. कॉमेडीच्या नावावर कंटाळा, त्यात प्रियांकानं हा सिनेमा का निवडला असेल? हा प्रश्न शेवटपर्यंत पडतो.
काय रे रास्कला या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही या सिनेमाला देतेय 2 स्टार्स...