सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला लागली आग; आगीत फ्लॅट जळून खाक, एक महिला जखमी

दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराचं आग लागल्याने मोठं नुकसान झालं आहे. आग लागली तेव्हा घरात अनेक लोक उपस्थित होते.  

शिवराज यादव | Updated: Dec 14, 2023, 01:02 PM IST
सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला लागली आग; आगीत फ्लॅट जळून खाक, एक महिला जखमी title=

हिंदी तसंच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी छाप पाडणारे दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग लागली आहे. बुधवारी हा प्रकार घडला. अहमदनगरच्या सुमन अपार्टमेंटमध्ये असलेल्या त्यांच्या घराला ही आग लागली होती. आगीत त्यांच्या घरातील सर्व सामान जळून खाक झालं आहे. इमारतीत शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचं समोर आलं आहे. 

13 डिसेंबरला म्हणजेच बुधवारी जवळपास 2 वाजता सदाशिव अमरापूरकर यांच्या घरात ही आग लागली. आग लागली तेव्हा घरात अनेक लोक उपस्थित होते. आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. सुदैवाने अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळी दाखल झाले आणि लोकांना सुरक्षित बाहेर काढलं. 

आगीत घरातील सामान जळाल्याने फार नुकसान झालं आहे. तसंच धुरामुळे एका महिलेची प्रकृती बिघडली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वीजेचा दाब वाढल्याने तळमजल्यावर असणाऱ्या शॉर्ट सर्किटमधील वायरमध्ये आग लागली. यादरम्यान तळमजल्यावर कोणीही नसल्याने आग तात्काळ नियंत्रात आणता आली नाही. शॉर्ट सर्किटमुळे इमारतीतील रहिवाशांच्या घरातील इलेक्ट्रिक सामानाचं नुकसान झालं आहे. 

सदाशिव अमरापूरकर यांच्या कुटुंबाचे सुमन अपार्टमेंटमध्ये 4 फ्लॅट आहेत. हे घर त्यांची पत्नी सुनंदा सदाशिव यांच्या नावे आहेत. पत्नीने सर्व घरं भाड्याने दिली आहेत. तसंच सर्व कुटुंब मुंबई आणि पुण्यात राहतं. 

सदाशिव अमरापूरकर यांनी हिंदीत 'मोहरा', 'अर्धसत्य', 'हम है कमाल' आणि 'सडक' अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सडक चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. 2014 मध्ये त्यांचं निधन झालं.