मुंबई : अखेर तो क्षण आलाच.... बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरलेला असताना सरतेशेवटी त्यांनी लग्नगाठ बांधली. इटलीतील लेक कोमो नावाच्या नयनरम्य ठिकाणी असणाऱ्या जवळपास ७०० वर्षे जुन्या Villa del Balbianello येथे त्या दोघांनी बुधवारी म्हणजेच १४ नोव्हेंबरला आयुष्यभरासाठी एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.
कोंकणी पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्यामध्ये मोजक्या पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
'दीप-वीर' लग्नाच्या बेडीत अडकल्याचं कळताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं. मुख्य म्हणजे त्यांच्या या स्वप्नवत विवाहसोहळ्यातील फोटो पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
बी- टाऊनच्या या सर्वात लाडक्या जोडीचे फोटो अधिकृतपणे समोर आले नसले तरीही सध्या विवाहस्थळावरुन काही फोटो आणि व्हिडिओ मात्र अनेकांचच लक्ष वेधत आहेत.
'एएनआय' या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटवरुन याच विवाहसोहळ्यातील एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. दुरून चित्रीत करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दीपिका आणि रणवीर दिसत असून, मिळत असलेल्या माहितीनुसार दीपिकाने तिच्या लग्नाच्या वेळी पारंपरिक प्रकारच्या लाल आणि सोनेरी रंगाच्या साडीला प्राधान्य दिलं होतं.
#WATCH: Visuals from Villa del Balbianello at Lake Como, the wedding venue of Deepika Padukone & Ranveer Singh, in Italy's Lombardy pic.twitter.com/47Jk1MmU2j
— ANI (@ANI) November 14, 2018
हा व्हिडिओ सध्याच्या घडीला त्यांच्या लग्नाचा एकमेव व्हिडिओ ठरत असल्यामुळे,त्याला असंख्य व्ह्यूज मिळाले असून, अनेकांनी तो स्वत:च्या अकाऊंटवरुन शेअरही केला आहे. पण, आता नेमकं 'मिस्टर' आणि 'मिसेस' सिंग त्यांच्या लग्नाचे अधिकृत फोटो कधी पोस्ट करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
#DeepikaRanveerWedding