Actrees Anjali Patil News: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अंजली पाटिल हिची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर चोरांनी अंजली पाटिलची तब्बल 5.79 लाखांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली हिला फोन करत तिच्या पार्सलम्ये ड्रग्स सापडल्याचा खोटा दावा केला होता. त्याचबरोबर तिच्या तीन बँक खात्यांचा मनी लाँड्रिगसोबत संबंध असल्याचीही खोटी माहिती दिली होती. खोटा दावा करत अंजलीची लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अंजली ही अंधेरी येथे राहते. 28 डिसेंबर रोजी तिला अका अज्ञात नंबरवरुन फोन आला. कॉलरने तिला सांगितले की तो फेडेक्स कुरियर कंपनीचा कर्मचारी दीपक शर्मा म्हणून बोलतो. दीपकने अंजलीला म्हटलं की तैवानला तिच्या नावाने जाणाऱ्या एका पार्सलमध्ये नशेची औषधं सापडली आहेत.हे पार्सल सीमा शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केले आहे. त्या पार्सलमध्ये तिच्या आधारकार्डची एक झेरॉक्सदेखील जोडण्यात आली आहे. त्यामुळं कोणत्याही कायदेशीर कारवाईत न अडकण्यासाठी व आधारकार्डचा दुरुपयोग होऊ शकतो यासाठी मुंबई सायबर विभागाची मदत घ्या. दीपकच्या या फोननंतर सायबर पोलिसमधून बॅनर्जी नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने तिला म्हटलं की तिचे आधार कार्ड मनी लॉंड्रिगसंबंधित अडकलेल्या तीन बँक खात्याशी जोडले गेले आहे.
बॅनर्जी याने पुढे म्हटलं आहे की, पडताळणीसाठी तिला 96,525 रुपयांची प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. ही रक्कम बॅनर्जीने तिला गुगल पे करण्यास सांगितली. त्यानंतर स्वाइप कॉल करुन बॅनर्जीने या मनी लाँड्रिंग घोटाळ्यात बँकेतील अधिकारीदेखील सहभागी असून ही केस रद्द करण्यासाठी 4,83,291 रुपये आणखी जमा करावे लागतील, असा दावा केला. या फोन कॉलनंतर अंजली घाबरली आणि बदनामीच्या व पोलिस केसच्या भीतीने तिने पैसे देण्याचे ठरवले. बनावट अधिकारी बनून तिच्याशी बोलणाऱ्या बॅनर्जी नावाच्या व्यक्तीच्या पंजाब नॅशनल बँक खात्यात तिने सर्व रक्कम जमा केली. या घटनेनंतर अंजलीने हा किस्सा तिच्या घरमालकाला सांगितला. तेव्हा तिच्यासोबत फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिने तातडीने पोलिसांची मदत घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
पार्सलमध्ये ड्रग्ज असणे आणि आधार कार्डचा वापर करून लोकांना मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्यासाठी स्काईप कॉलची धमकी देणे या सायबर ठगांनी लोकांना फसवण्यासाठी वापरलेल्या काही युक्त्या आहेत. हे टाळण्यासाठी जागरूक राहणे आणि अशा कॉलर्सचे कॉल ब्लॉक करणे शहाणपणाचे ठरेल. त्यामुळं असे फोन कॉल आल्यास तातडीने नंबर ब्लॉक करावा किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार करावी, असं अवाहन पोलिसांनी केलं आहे.