आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या त्याला योग्य समुपदेशन, सल्ल्यांची गरज आहे. 25 वर्षीय खेळाडूला आपल्या संघात घेण्यात 10 पैकी एकही संघ उत्सुक नाही. फॉर्ममध्ये नसणाऱ्या पृथ्वी शॉवर अनेकदा शिस्तीचं पालन न करण्याचं तसंच प्रशिक्षणाला दांडी मारण्याचे आरोप झाले आहेत. याचा फटका त्याला रणजीमध्येही बसला असून, मुंबई संघातून वगळण्यात आलं आहे. यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नवख्या तरुणांना, खेळाडूंना दिलेला एक सल्ला सध्या चर्चेत आहे.
मंगळवारी, सचिन तेंडुलकरने त्याचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन केले. यावेळी सचिनने देशातील तरुणांना शिस्तीचा धडा दिला आणि त्यांना त्यांच्या किटबद्दल अधिक आदर बाळगण्याचं आवाहन केले. रमाकांत आचरेकरांच्या सर्वात मौल्यवान धड्यांपैकी एक म्हणत, तेंडुलकरने खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट किटचाही आदर बाळगण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.
"सरांनी आम्हाला आमच्या किट्सचा आदर करायला शिकवले. निवृत्त झाल्यापासून, मी हे बऱ्याच खेळाडूंना सांगत आलो आहे, आणि मी अनेक खेळाडूंमध्ये हे पाहतो. आऊट झाल्यानंतर परतत असताना ते बॅट फेकतात आणि बरंच काही करतात. तुम्ही आज त्या बॅटमुळेच या ड्रेसिंग रूममध्ये बसला आहात. त्यामुळे कृपया ती कधीच फेकू नका," असं आवाहन सचिन तेंडुलकरने केलं.
"मी येथे अनेक तरुण क्रिकेटपटूंना पाहत आहे. कृपया लक्षात ठेवा, तुमचं किट कधीही फेकू नका, मग ती बॅट असो, ग्लोव्ह्ज असो किंवा इतर काहीही असो. त्याचा नेहमी आदर करा. त्यांना ठेवण्यासाठी एक जागा आहे आणि ती तिथेच असावी. तुमच्या अपयशाची निराशा किटवर काढू नका. सरांनी आम्हाला लहानपणापासून ही शिकवण दिली. आम्ही ही शिकवण पुढील पिढीपर्यंत देण्याचं आश्वासन आम्ही देतो. मी त्यांच्याइतकं चांगलं करु शकेन का याची कल्पना नाही. आपल्यातील कोणीही त्यांच्या पातळीवर पोहोचू शकत नाही," असं सचिन तेंडुलकर म्हणाला.
तेंडुलकरने सांगितल्याप्रमाणे शिस्त ही मूलभूत गोष्टींपासून सुरू होते आणि पृथ्वी शॉ या सल्ल्याचा उपयोग करू शकतो. सचिन तेंडुलकरने पृथ्वी शॉसह चर्चा केलेली नाही अशी गोष्ट नाही. 2020 च्या सुरुवातीला बंदी घातलेल्या पदार्थाचा वापर केल्याबद्दल बीसीसीआयने त्याला निलंबित केलं होतं. तेव्हा सचिनने शॉसह संवाद साधला होता. पण त्याचा काही फायदा झाला नाही. पृथ्वी शॉ आजही चार वर्षांपूर्वी होता तिथेच आहे.