मुंबई : दिवंगत सदाबहार अभिनेते फारुख शेख यांचा आज जन्मदिवस आहे. २७ डिसेंबर २०१३ मध्ये दुबईत अचानक त्यांचे निधन झाले. त्यांचा आज ७० वा वाढदिवस. २५ मार्च १९४८ मध्ये गुजरातमधील अमरोलीत त्यांचा जन्म झाला. त्यांचा वाढदिवस चक्क गुगलने ही डुडल करत साजरा केला.
इप्टा या नाट्य संस्थेत अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा सिनेमांकडे वळवला. ७० आणि ८० च्या दशकात समांतर सिनेमांमध्ये त्यांनी चांगलीच वाहवा मिळवली. १९७३ मध्ये आलेल्या गर्म हवा मधून त्यांनी सिनेसृष्टीत पर्दापण केले. त्यानंतर त्यांनी उमराव जान, चश्मे बहादूर, नूरी, शतरंज के खिलाड़ी, माया मेम साब, कथा, बाजार, रंग बिरंगी यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले.
फारुख यांची दीप्ती नवलसोबतची जोडी हिट ठरली.
फारुख यांचे वडील मुस्तफा शेख मुंबईत एक प्रतिष्ठित वकील होते. तर आई फरीदा शेख या गृहिणी होत्या. फारुख यांनी त्यांचे शालेय शिक्षण सेंट मेरी स्कूल मधून पूर्ण केले. त्यांच्यावरील संस्कारांचे श्रेय ते त्यांच्या वडीलांना देत.