मुंबई : हॉलिवूडमधील गाजलेल्या बॉन्ड सिरीजच्या २५व्या चित्रपटात ब्रिटीश सीक्रेट एजंट झीरो-झोरो सेव्हन ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नव्हे, तर एक अभिनेत्री साकारणार आहे. 'बॉन्ड'फेम अभिनेता डेनियल क्रेगच्या जागी ब्रिटीश अभिनेत्री लशाना लिंच ही सीक्रेट एजंट झीरो-झोरो सेव्हनच्या भूमिकेत दिसणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातून क्रेग एका हेराच्या रुपात अनपेक्षित एंट्री घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
परिणामी चित्रपटाच्या कथानकाविषयीचे अनेक प्रश्न आतापासूनच प्रेक्षकांच्या मनात घर करु लागले आहेत. लशानाने 'कॅप्टन मार्वल' या चित्रपटात साकारलेल्या साहसी पायलट 'मारिया राम्बेऊ' या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे ००७च्या रुपातील तिचा हा नवा अंदाज पाहण्यासाठी आता प्रेक्षकही उत्सुक आहेत.
इटली आणि युनायटेड किंगडम या ठिकाणी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ लशाना आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिच्या भूमिकेसाठीची आणि पर्यायी चित्रपटासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा बहुचर्चित चित्रपट यूके आणि भारतात ३ एप्रिल २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.
एकिकडे लशानाच्या भूमिकेविषयीची उत्सुकता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे याच अभिनेत्रीविषयी काही वेगळ्या चर्चाही पाहायला मिळत आहे. अमेरिकन स्तंभलेखक बेन सफीरो यांनी याविषयीचं त्यांचं मत मांडत अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
एक महिला बॉन्डची व्यक्तीरेखा साकारु शकत नाही. कारण, प्रेक्षक हे पुरुष व्यक्तीरेखेलाच बॉन्ड समजतात. बॉन्डची व्यक्तीरेखा ही Guns आणि Girls यांच्याशी संबंधित आहे. पण, ज्यावेळी या गोष्टी पुढे येतात तेव्हा महिला आणि पुरुषांमध्ये फार फरक असतो. बरं ही व्यक्तीरेखा समलैंगिक असेल असा विचारही मी करु शकत नाही. मला ठाऊक नाही, पण कुणास ठाऊक हासुद्धा कथानकाचा एक पैलू असू शकतो.