बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या बहुप्रतिक्षित 'फायटर' (Fighter) चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ह्रतिक रोशन आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना प्रतिक्षा लागली होती. त्यातच आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.
फायटर चित्रपटाच्या टिझरमध्ये दिसत आहे त्यानुसार ह्रतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर हवाई दल वैमानिकाच्या भूमिकेत असणार आहेत. दरम्यान, टीझर पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढत आहे. तसंच चित्रपटातील दृश्यं डोळ्यांना सुखावणारी असतील असा अंदाज आहे. सध्या तरी हा चित्रपट युद्धात सहभागी वैमानिकांवर आधारित असावा असा अंदाज टीझरवरुन येत आहे.
हा टीझर शेअर करताना ह्रतिक रोशनने लिहिलं आहे की, “#SpiritOfFighter | वंदे मातरम! 75 व्या प्रजासत्ताक दिनाला चित्रपटगृहांमध्ये भेटूयात. 25 जानेवारी 2024 रोजी चित्रपट जगभरात प्रदर्शित होईल".
#SpiritOfFighter | Vande Mataram
See you in the theaters on the eve of India’s 75th Republic Day. Fighter releases worldwide on 25th January 2024. pic.twitter.com/23fvysWgsV
— Hrithik Roshan (@iHrithik) August 15, 2023
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं होतं की, ह्रतिक फायटर चित्रपटात पॅटीची भूमिका निभावत आहे. यावेळी त्याने दीपिकाच्या भूमिकेबद्दलही थोडक्यात सांगितलं होतं. त्याने म्हटलं होतं की, “मी नेहमी हे सांगतो की, महिलेच्या भूमिका खरोखरच मजबूत आणि अतिशय रोमांचक असतात. दीपिकाही 'फायटर'मध्ये एअरफोर्स ऑफिसरची भूमिका साकारत आहे. ती युनिटचा एक भाग आहे, हवाई दलाचं एक महत्त्वाचं युनिट, आणि ते बर्याच वास्तविकतेवर आणि सत्यतेवर आधारित आहे. त्यामुळे दीपिकाने याआधी कधी केलेली नाही अशी भूमिका आहे. तिने यात अक्षरशः जीव ओतला आहे आणि खरे सांगायचे तर, ती खऱ्या आयुष्यात तिच्यासारखीच आहे.”
फायटर चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. आज स्वातंत्र्यदिन असल्याने देशभक्तीवर आधारित या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, चाहत्यांना तो प्रचंड आवडला आहे.