होय...मी माझ्या वडिलांमुळे कलाविश्वात आहे - सोनम कपूर

बॉलिवूड, घराणेशाही आणि सोशल मीडिया...   

Updated: Jun 21, 2020, 05:33 PM IST
होय...मी माझ्या वडिलांमुळे कलाविश्वात आहे - सोनम कपूर

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा तुफान रंगला आहे. सर्वत्र वरूण धवन, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यावर टीका होत आहे. शिवाय या ट्रोलींगला कंटाळून काही स्टारकिड्सने आपले ट्विटर अकाऊंट देखील डिलीट केले आहेत. त्याचप्रमाणे नव्या कलाकारांना संधी न देण्याचे आरोप  करण जोहर, सलमान खान, एकता कपूर अशा अनेक निर्मात्यांवर होत आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री सोनम कपूरने ‘फादर्स डे’चं निमित्त साधत घराणेशाहीवरून टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं

फादर्स डेचं औचित्य साधत तिने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'आज फादर्स डेच्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची आहे. होय.. मी माझ्या वडिलांची मुलगी आहे. मी आज कलाविश्वात आहे  ते फक्त माझ्या वडिलांमुळे. मला विशेषाधिकार आहेत. माझ्या वडिलांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, त्यामुळे मला सर्व गोष्टी मिळाल्या आहेत. आणि माझ्या कर्मांमुळे माझा जन्म याठिकाणी झाला याचा मला गर्व आहे.' असं वक्तव्य तिने केलं आहे. 

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी किड्सच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर अभिनेत्री कंगना रानौत सारख्या बाहेरून आलेल्या आणि बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या कलाकारांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. 

सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक नव्या चर्चांना उधाण आले आहे. पोलीस देखील याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत याप्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. परंतु अद्यापही पोलिसांच्या हाती त्याच्या आत्महत्येमागचं ठोस कारण लागलेलं नाही.