राहुल गांधी यांनी मदत केली नसती तर आज... अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Rahul Gandhi : कन्नड अभिनेत्री राम्या यांनी त्यांच्या आयुष्यातील घडमोडीबाबत अनेक खुलासे केले आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतःला संपवण्याचा विचार सुरु केला होता, असा खुलासा राम्या यांनी केला आहे.

Updated: Mar 30, 2023, 07:09 PM IST
राहुल गांधी यांनी मदत केली नसती  तर आज... अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा title=
(फोटो सौजन्य - PTI)

Ramya : कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेमुळे (bharat jodo yatra) काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. त्यानंतर सूरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतली आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दुसरीकडे अभिनेत्रीने केलेल्या एका खुलाश्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधी यांचा भावनिक आधार मिळाला नसता तर आज मी जीव दिला असता असा खुलासा कन्नड अभिनेत्री  राम्या (annada actress ramya) यांनी केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना राम्या यांनी हा खुलासा केला आहे.

अभिनेत्री राम्या या लोकसभेच्या खासदार देखील होत्या. त्यांना दिव्या स्पंदन असेही म्हटले जात होते. माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. तेव्हा राहुल गांधींनी मला भावनिक आधार दिला, असा खुलासा राम्या यांनी नुकताच केला आहे. एका कन्नड टॉक शोमदरम्यान राम्या यांनी याबाबत भाष्य केले. "माझ्या वडिलांच्या निधनानंतर दोन आठवड्यांनी मी संसदेत गेले होते. मी कोणाला ओळखत नव्हते. संसदेच्या कामकाजाबद्दलही मला फार काही माहिती नव्हती. मी हळूहळू सगळं शिकत गेले आणि माझ्या दुःखातून सावरत कामावर लक्ष केंद्रित केले. मंड्याच्या लोकांनी मला साथ दिली, त्यामुळे मी आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकले," असे राम्या म्हणाल्या.

राहुल गांधी यांनी दिला भावनिक आधार

"माझे वडील गेल्यानंतर माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येऊ लागला. जेव्हा वडील गमावले तेव्हा मी आतून तुटले होते. मी निवडणूकही हरले होते. तो काळ दुःखाचा होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी मला भावनिक आधार दिला. माझ्यावर माझ्या वडिलांचा सर्वाधिक प्रभाव होता. यानंतर माझ्या आईचा माझ्या प्रभाव आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहुल गांधी आहेत, ज्यांनी माझ्या आयुष्यावर छाप सोडली आहे," असेही राम्या म्हणाल्या.

अभिनयाच्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना राम्या यांनी राजकारणात प्रवेश केला होता. राम्या 2012 साली युवक काँग्रेसमध्ये सामील झाल्या होत्या. पक्षात काम केल्यानंतर राम्या यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2013 मध्ये कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकली. यानंतर राम्या या काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख होत्या. मात्र त्यांनी काही काळानंतर पदाचा राजीनामा दिला. 2019 मध्ये निवडणूक हरल्यानंतर त्यांनी राजकारणातून काढता पाय घेतला. गेल्या वर्षी राम्या यांनी जाहीर केले की त्या चित्रपटसृष्टीकडे पुन्हा वळत आहेत. यावेळी त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू करणार असल्याची घोषणाही केली होती. त्यांनी ऍपल बॉक्स स्टुडिओ नावाने प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.