मुंबई : अभिनेता अरविंद स्वामी यांना मणि रत्नम यांच्या 'रोजा' चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे ओळखण्यात येते. सध्या ते 'थलायवा' चित्रपटामध्ये तामिळ सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी सज्ज झाले आहे. तर चित्रपटात दिवंगत जयललिता यांची व्यक्तिरेखा बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रानौत साकारणार आहे. १९६५ ते १९७३ या काळात एमजीआर आणि जयललिता यांनी जवळपास २८ सुपरहीट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.
गत वर्षापासून बॉलिवूडमध्ये बायोपिक साकारण्याचे सत्र सुरू आहे. राजकारणी, खेळाडू यांच्या यशोगाथेवर बेतलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. कंगणाने 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. बॉक्स ऑफिवर चित्रपटाने चांगलीच मजल मारली आणि प्रेक्षकांची, समिक्षकांची मने जिंकली.
जयललिता यांच्या बायोपिकचे नाव 'थलायवा' असे आहे. जयललीता यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय करणार असून जो केवी विजयेंद्र प्रसाद चित्रपटाचे लेखण करणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती विष्णु वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह करणार आहेत.