मुंबई : 'रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते हैं... नाम है....', असं म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो एकच चेहरा आणि कानांत घुमतो, तो एकच आवाज. हा आवाज आणि हा चेहरा असतो बिग बी, अमिताभ बच्चन यांचा. रुपेरी पडदा गाजवणारे बिग बी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही कायमच आनंदाच्याच शोधात असतात. त्यांचं असंच आनंदी रुप नुकतंच पाहायला मिळालं.
निमित्त होतं ते म्हणजे 'कौन बनेगा करोड़पती' (Kaun banega crorepati 13) या कार्यक्रमाचा 1000 वा भाग.
केबीसीच्या खास भागाच्या निमित्तानं बिग बींची लेक श्वेता बच्चन नंदा आणि त्यांची नात नव्या नवेली हॉट सीटवर आल्या. तिथं येताच त्यांनी जे काही केलंय ते पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू येत आहे.
कार्यक्रमाच्या खास भागाच्या निमित्तानं एक खास प्रोमो वाहिनीकडून पोस्ट करण्यात आला आहे.
प्रोमोमध्ये नव्या तिच्या आजोबांची तक्रार करताना दिसत आहे. तर, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जया बच्चन यासुद्धा या संवादात सहभागी होताना दिसत आहेत.
यांना कितीही फोन लावा, ते उचलतच नाहीत... अशी तक्रार जया बच्चन सर्वांसमोर करत असतानाच इंटरनेट गडबडतं, त्याला मी काय करु असं म्हणत बच्चन स्वत:ची बाजू मांडताना दिसत आहेत.
वडील त्यांची बाजू मांडत असतानाच आईची बाजू घेत, बिग बींची लेक अगदी खोडकरपणे त्यांच्याच विरोधात जाताना दिसली.
हे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतात, ट्विट करतात आणि म्हणतात इंटरनेट गडबडलंय. हे सांगितल्यानंतर बिग बींच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे दिसत आहेत.
करीना कपूर अभिषेकला का बोलली 'जीजू'? हे नातं कोणतं
आम्ही पार्लरमधून येतो तेव्हा आजोबा म्हणतात, किती छान दिसताय... खरंच छान दिसत असतो की उगाचच प्रशंसा करत असता असं कोडं बच्चन यांना त्यांची नात विचारताना दिसते.
नातीच्या या कोड्याला बगल देत असताना बिग बींनी तिथं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर झालेल्या पत्नीला म्हणजेच जया बच्चन यांना तू किती छान दिसतेय असं म्हणत प्रशंसा केली.
तेव्हाच, खोटं बोलताना तुम्ही अजिबात चांगले दिसत नाही, असं म्हणत जया यांनीही बिग बींना पेचातच पाडलं.
या सेलिब्रिटी जोडीची ही गोड केमिस्ट्री यावेळी सर्वांचीच मनं जिंकून गेली.