बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रभास (Prabhas) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या प्रमुख भूमिका असणारा Kalki 2898 AD अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या चित्रपटात कमल हासन यांनीही काम केलं आहे. चित्रपटात ते व्हिलनच्या भूमिकेत असून, त्यांच्याही अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. पण चित्रपटात कमल हासन (Kamal Haasan) यांना जास्त स्क्रीन टाईम मिळालेले नाही. चित्रपट रिलीज झाल्यानंतर कमल हासन यांनी स्क्रीन टाईमवर मौन सोडलं आहे.
कमल हासन यांनी एका मुलाखतीत Kalki 2898 AD चित्रपटातील आपल्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. कमी स्क्रीन टाईमवर ते म्हणाले की, "चित्रपटात मी फार छोटी भूमिका निभावली आहे. ही पात्र फक्त काही मिनिटांसाठी दिसतं. चित्रपटात माझा खरा भाग आता सुरु झाला आहे. मला दुसऱ्या भागात भरपूर काही करायचं आहे. म्हणून मी फक्त एक चाहता म्हणून हा चित्रपट पाहिला असून तो पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झालो".
पुढे ते म्हणाले की, "चित्रपटात काम केल्यानंतर मला आता हिंदी सिनेमा ग्लोबल एंटरटेनमेंटच्या दिशेने जात आहे असं वाटलं. कल्कि 2898 एडी हा त्यातील एक चित्रपट आहे. नाग अश्विनने कोणताही धार्मिक भेदभाव न करता पौराणिक कथा फार काळजीपूर्वक सांभाळली आहे. जगात फक्त जपान, चीन आणि ग्रीक येथीलच कथा भारतीय इतिहासाच्या जवळ येऊ शकतात. अश्विनने तेथील कथा निवडल्या आणि सर्वांना एकत्र करुन फार सावधगिरीने त्या शेवटपर्यंत नेल्या आहेत".
कमल हासन यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं गेल्यास ते लवकरच 'हिंदुस्तानी 2' मध्ये दिसणार आहेत. 12 जुलैला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला दिग्दर्शक शंकर आणि समाजात विकास झाल्याचं दिसत आहे. हा चित्रपट लोकांना तुम्ही भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय करु शकता हा प्रश्न विचार करण्यास भाग पाडेल असं कमल हासन म्हणाले आहेत. 'हिंदुस्तानी 2' मध्ये कमल हासन यांच्यासह सिद्धार्थ, काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंहसारखे कलाकार दिसतील.