मुंबई : आपलं मत स्पष्टपणे मांडण्याच्या शैलीसाठी नेहमीच चर्चेत असलेली कंगना रनौत आजकाल तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्या चित्रपटामुळे ती बऱ्याच काळापासून तयारी करत होती आणि जोरदार घाम गाळत होती तो सिनेमा म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. 'इमरजंन्सी' मध्ये कंगना रनौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार असून नुकतीच तिने तिच्या तयारीची झलक देखील दाखविली आहे. पण या चित्रपटात अभिनय करण्याव्यतिरिक्त आता कंगना रनौतही या सिनेमाचं दिग्दर्शन देखील करणार आहे. तिच्यापेक्षा कुणीही या सिनेमाचं दिग्दर्शन करू शकत नाही असं मत कंगना रनौतने मांडलं आहे.
कंगना रनौतने अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर केलं की, तिचा पुढचा प्रोजेक्ट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर असेल, ज्याचं नाव 'इमरजेंसी' आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कंगना रनौत करणार असून कथा रितेश शाह लिहिणार आहेत.
'माझ्यापेक्षा दुसरा कोणीही उत्तम दिग्दर्शन करु शकत नाही'
चित्रपटाचं वर्णन करताना कंगना रनौतने लिहिलं की, 'पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसून मला खूप आनंद झाला. एका वर्षाहून अधिक काळ 'इमरजेंसी' वर काम केल्यानंतर मला कळलं की माझ्यापेक्षा कोणीही या चित्रपटाचं दिग्दर्शन करू शकत नाही. या चित्रपटासाठी लेखक रितेश शहा यांच्यासोबत मी काम करत आहे. हा चित्रपट करण्यासाठी जरी मला अभिनयाचे प्रोजेक्ट सोडून द्यावे लागले तर मी ते ही करीन. मी या प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहे.'
'इमरजेंसी' हा बायोपिक नाही
या वर्षाच्या सुरुवातीला कंगना रनौतने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं होतं की 'इमरजेंसी'ची तयारी अंतिम टप्प्यात आहे, ज्यात इंदिरा गांधींचे दोन मोठे निर्णय - ऑपरेशन ब्लू स्टार आणि आणीबाणीला महत्त्व दिलं जाईल. कंगना रनौतनेही स्पष्ट केलं की, तिचा चित्रपट बायोपिक नसून एक राजकीय नाट्य असेल.
त्याचवेळी कंगना रनौतने 'इमरजेंसी' तयारीच्या काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यात तिचं शरीर इंदिरा गांधींच्या चारित्र्यासाठी स्कॅन केलं जात होतं. फोटो शेअर करताना कंगनाने लिहिलं की, 'प्रत्येक पात्र ही एक नवीन प्रवासाची सुंदर सुरुवात असते. लुक परिपूर्ण होण्यासाठी आज आम्ही शरीर, चेहरा स्कॅन आणि कास्ट यासह इंदिराचा प्रवास सुरु केला आहे. कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती या सिनेमा व्यतिरिक्त 'तेजस', 'धाकड' आणि 'थलावी' सारख्या चित्रपटांत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.