मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हा छोट्या पडद्यावरील मोठा स्टार आहे. टीव्ही जगतात नाव कमावण्यासोबतच 'किस किसको प्यार करूं' आणि 'फिरंगी' यांसारख्या चित्रपटांतून त्याने अभिनयातही नशिब आजमावला आहे. पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता तर दुसरा फ्लॉप ठरला, पण तरीही त्याला त्याच्या 'द कपिल शर्मा शो' शोसाठी चाहत्यांकडून खूप प्रेम मिळतं. पण तुम्हाला माहीत आहे का की तो सनी देओलच्या 'गदर एक प्रेम कथा' (Gadar Ek Prem Katha) या चित्रपटाचाही भाग होता?
कपिल शर्माने 2001 मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर' चित्रपटात काम केले होते. पण कपिलने शूटिंगदरम्यान असे कृत्य केले की त्याचा सीन चित्रपटातून कट करण्यात आला. याचा खुलासा कपिलने त्याच्या कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये केला होता. कपिलने सांगितले होते की, अमृतसर मध्ये 'गदर' चित्रपटाच्या एका सीनचे शूटिंग सुरू होते. त्यानंतर एक अफवा पसरली की जो कोणी शूटिंगचा भाग असेल त्याला सनी देओलला भेटण्याची संधी मिळेल. हे ऐकून कपिल शर्माही शूटिंग लोकेशनवर पोहोचला. पण त्या दिवशी फक्त अमरीश पुरी आणि अमिषा पटेलच्या सीनचं शूटिंग होणार असल्याचं कळलं. अशा स्थितीत कपिललाही एक सीन शूट करण्यास सांगितले होते.
सीनप्रमाणे ट्रेनच्या मागे कपिलला धावायचे होते आणि तसचं धावत त्याला ट्रेन पकडायची होती. त्या सीनमध्ये कपिल शर्मा दोन-तीन वेळा ट्रेनमध्ये चढला. पण नंतर त्याला वाटलं की आपण अशा गर्दीत दिसणार नाही आणि मग तो सीन चित्रपटात येणारच नाही. मग कपिलनं एक आयडिया सुचली आणि सांगितलं की, अॅक्शन डायरेक्टर 'अॅक्शन' बोलताच संपूर्ण जमाव ज्या दिशेला धावला, त्याच्या विरुद्ध दिशेने तो धावला. दिग्दर्शकाने हे पाहताच कपिलला पकडून शिवीगाळ केली. कपिल तरीही आनंदी होता आणि तो विचार करत होता की आता तो स्वत:ला या चित्रपटात पाहू शकेल, पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाल्या तेव्हा तो त्याच्या एका मित्रासोबत चित्रपटगृहात गेला होता. तेव्हा त्याल्या कळलं की चित्रपटात त्याचा सीनच नाही. त्याचा सीन कट करण्यात आल्याचे त्याने सांगितले.