बॉक्स ऑफिसवर 'जोश', मात्र साराचा 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास नकार

काम न करण्याविषयी तिने काही कारणंही दिल्याचं कळत आहे.

Updated: Mar 12, 2019, 12:33 PM IST
बॉक्स ऑफिसवर 'जोश', मात्र साराचा 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास नकार

मुंबई : 'केदारनाथ', 'सिम्बा' अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री सारा अली खान हिच्या काकिर्दीला चांगलीच चालना मिळाली आहे. चित्रपटांची निवड म्हणू नका किंवा मग कलाविश्वात एक नवा चेहरा असूनही सराईताप्रमाणे असणारा तिचा वावर म्हणू नका. सारा नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिचा हाच अंदाज पाहता फार कमी काळातच ती प्रसिद्धीझोतात आली आहे, असं म्हणायला हरकत नाही. साराच्या चित्रपट निवडींचा विषय निघालेला असतानाच सध्या एक महत्त्वाची चर्चा समोर आली आहे. ती चर्चा म्हणजे तिने नाकारलेल्या एका मोठ्या प्रोजेक्टची, अर्थात एका आगामी चित्रपटाची. 

'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेता विकी कौशल याची मुख्य भूमिका असणारा चित्रपट तिने नाकारला आहे. 'डेक्कन क्रोनिकल'ने प्रसिद्घ केलेल्या वृत्तानुसार साराने अतिशय समंजसपणे विकीची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. 

चित्रपटात आपल्या पात्राला पूरेसा वाव मिळण्याची चिन्हं नसल्याचं कारण देत तिने हा प्रस्ताव नाकारला आहे. त्याशिवाय लव आज कल या चित्रपटाच्या व्यग्र वेळापत्रकाचं कारणही तिने पुढे केल्याचं कळत आहे.  विकीसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी ही साराच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती, असं अनेकांचच मत आहे. पण, करिअरच्या दृष्टीने तिने हा विचार परिस्थिती जाणून घेतल्यानंतर घेतल्याचं समोर येत आहे. 

विकीची मुख्य भूमिका असणाऱ्या शहीद उधम सिंग यांच्या जीवनावर आणि कार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटाचं दिग्जर्शन शूजित सरकार करणार असून, जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल डायर याचा खात्मा करणाऱ्या एका स्वातंत्र्यसैनिकाची गाथा चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. राम मोहन सिंग आझाद म्हणजेच शहीद-ए-आझम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उधम सिंग यांच्या बायोपिकच्या बऱ्याच चर्चा दर दिवसाआड समोर येत आहेत. पण, अद्यापही यात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार आहे, यावरुन मात्र पडदा उचलण्यात आलेला नाही.