मुंबई : लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या एका वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत प्रेक्षकांना आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला आहे. आर्मीचं प्रशिक्षण घेण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो.
तेवढाच कालावधी अजिंक्यच्या जडणघडणीसाठी मालिकेमध्ये लागला आहे. तर नऊ दहा महिन्याचं आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मुलं देशसेवेची शप्पथ घेतात आणि खऱ्या अर्थानं फौजी बनतात. अजिंक्यच्या संपूर्ण ट्रेनिंग आणि कसम परेड नंतर आता वेळ आली आहे ती म्हणजे अजिंक्यच्या पोस्टिंगची.
लग्न झाल्यानंतर आता अजिंक्यला पोस्टिंगचं पात्र आलं आहे. त्याच्या कामावर रुजू होण्याच्या सर्व लगबगीमध्ये सर्वाना एक धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे विक्रम शहीद झाल्याची. या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसतो, अजिंक्यतर पुरता हादरून जातो. विक्रमचं शहिद झाल्यामुळे अजिंक्यच्या डोक्यात विचित्र विचारांचं काहूर माजतं. त्याच पोस्टिंगच्या तयारीत असलेलं पाऊल अचानक अडखळतं. नुकतंच झालेलं लग्न, नवीन संसार त्याच्यावर असलेली शीतलच्या जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा विचार करून, शीतलचा विचार करुन पोस्टिंगसाठी जावं की नको हा पेच त्याच्यासमोर निर्माण होतो. अजिंक्य त्याचा कामावर रुजू होण्याचा निर्णय बदलेल का? अशा प्रसंगात शीतल अजिंक्यची साथ कशी देईल? हे प्रेक्षकांना रविवार २२ जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या १ तासाच्या विशेष भागात पाहायला मिळेल.