'या' दिग्दर्शकने लतादीदींना आपल्या सिनेमात गाण्याची संधीच दिली नाही, पण का?

गुलाम हैदर यांच्यावर लतादीदींच्या गायकीचा खूप प्रभाव होता. म्हणून त्यांनी लतादीदींना संधी देण्यासाठी दिग्दर्शकाला विनंती केली पण...

Updated: Feb 8, 2022, 02:57 PM IST
'या' दिग्दर्शकने लतादीदींना आपल्या सिनेमात गाण्याची संधीच दिली नाही, पण का? title=

मुंबई : इंदूरमध्ये जन्मलेल्या लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर मराठी रंगभूमीशी संबंधित होते. वयाच्या पाचव्या वर्षापासून लतादीदींनी वडिलांसोबत नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. परंतु 1942 मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी लतादीदींच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब पुण्याहून मुंबईत आले. लतादीदींना चित्रपटात काम करणे अजिबात आवडत नव्हते. परंतु तरीही कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेऊन लतादीदींनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली.

लतादीदींना 1942 मध्ये 'पहली मंगळगौर'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. 1945 मध्ये लतादीदींची भेट संगीतकार गुलाम हैदर यांच्याशी झाली. गुलाम हैदर यांच्यावर लतादीदींच्या गायकीचा खूप प्रभाव होता. गुलाम हैदर यांनी चित्रपट निर्माते एस. मुखर्जी यांना त्यांच्या शहीद चित्रपटात लतादीदींना गाण्याची संधी देण्याची विनंती केली.

परंतु एस. मुखर्जीं हे असे दिग्दर्शक होते, ज्यांना लतादीदींचा आवाज आवडला नाही आणि त्यांनी लतादीदींना त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला. यावर गुलाम हैदर चांगलेच संतापले आणि म्हणाले की ही मुलगी भविष्यात इतकं नाव मिळवेल की, मोठमोठे निर्माते-दिग्दर्शक तिला त्यांच्या चित्रपटात गाण्याची विनंती करतील.

परंतु अखेर 1949 मध्ये 'आयेगा आने वाला' हे गाणं त्यांनी 'महल' चित्रपटात गायलं, ज्यानंतर लतादीदींनी बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यात यश मिळवले. यानंतर राज कपूरच्या 'बरसात' मधील 'जिया बेकरार है', 'हवा में उडता जाये' सारखी गाणी गाऊन लता मंगेशकर यांनी बॉलिवूडमध्ये एक यशस्वी पार्श्वगायिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

सी. रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली, लतादीदींनी प्रदीप यांनी लिहिलेल्या गाण्यावर एका कार्यक्रमादरम्यान 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणं गायले. हे गाणे ऐकून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू इतके प्रभावित झाले की, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. लतादीदींनी गायलेल्या या गाण्याने आजही लोकांचे डोळे पाणावतात.

संगीतकार नौशाद यांना लतादीदींचा आवाज इतका आवडायचा की, ते त्यांच्या प्रत्येक चित्रपटात लतादीदींनाच कास्ट करायचे. मुगले आझम (1960) मधील 'मोहे पंगत पे गीत' या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान नौशाद यांनी लतादीदींना सांगितले, 'मी हे गाणे फक्त तुमच्यासाठी बनवले आहे, हे गाणे दुसरे कोणीही गाऊ शकत नाही'.

हिंदी चित्रपटसृष्टीचे शोमन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांना त्यांच्या चित्रपटांसाठी नेहमीच लता मंगेशकर यांच्या आवाजाची गरज भासत असे. त्यांनी लतादीदींना 'सरस्वती'चा दर्जाही दिला होता. साठच्या दशकात लतादीदींना पार्श्वगायिकांची राणी म्हटले जाऊ लागले.

1969 मध्ये लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लतादीदींनी 'इंटकम' मधील 'आ जाने जा' हे गाणे गाऊन ते आशा भोसले यांच्यासारख्या पाश्चात्य सुरांवर देखील गाऊ शकतात हे सिद्ध केले.

लतादीदींना त्यांच्या सिने कारकिर्दीत अनेकवेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1972 मध्ये परिचय चित्रपटासाठी, 1975 मध्ये कोरा कागजसाठी आणि 1990 मध्ये लेकीन चित्रपटासाठी गायलेल्या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय लतादीदींना 1969 मध्ये पद्मभूषण, 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 1999 मध्ये पद्मविभूषण आणि 2001 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.