मुंबई : 'मसान' चित्रपटापासून सुरु झालेल्या प्रवासानं अभिनेता विकी कौशल याला सध्याच्या घडीला ज्या टप्प्यावर आणून सोडलं आहे, हे पाहून सर्वांचेच डोळे अभिमानानं विस्फारतात. आपल्या वाट्याला आलेल्या चित्रपटामध्ये पूर्णपणे झोकून देत एखाद्या भूमिकेला न्या देण्यासाठी विकी ओळखला जातो.
दहा बाय दहाच्या खोलीत आपण कसे दिवस काढले असं सांगणाऱ्या विकीचा प्रवास याहीपेक्षा बराच संघर्षमय होता. अभिनयाकडे वळणं हा त्याचा जीवनातील एक मोठा निर्णय होता. (Vicky Kaushal)
महाविद्यालयीन दिवसांमध्ये विकीनं आयटी क्षेत्रात नोकरीसाठी इंटरव्ह्यू देण्याचं ठरवलं. मुलाखतीचं दडपण, कोणा एकाला आपला बायोडेटा देण्यासाठीची धडपड हे सारं त्याला अनुभवायचं होतं. किंबहुना त्याला नोकरीचं अपॉईन्मेंट लेटरही मिळालं होतं.
विकीचे वडील, अॅक्शन डिरेक्टर शाम कौशल त्याला 'कौशल परिवार का चिराग' असं म्हणायचे.
मुलाला आयटी क्षेत्रात मिळालेल्या नोकरीवर ते फार समाधानी होते. पण, विकीनं मात्र अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वडिलांनी या क्षेत्रात नेमका किती संघर्ष केला याची त्याला कल्पनाही नव्हती.
कधी एकेकाळी तर, त्यांनी जेवणाची सोय व्हावी म्हणूनही काम शोधलं होतं. वडिलांची संघर्षकथा ऐकल्यानंतर मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी विकीची महत्त्वाकांक्षा वाढली. आपण या क्षेत्रात 120 टक्के समर्पकतेनं काम करु असा निर्धार करत त्यानं वडिलांना विश्वास दिला आणि ऑफर लेटर फाडलं.
अभिनयासाठी त्यानं इंजिनियरिंग क्षेत्रातली नोकली सोडली होती. पहिल्या ऑडिशनलाच त्याला अतिशय वाईट अनुभव आला ज्यानंतर आपण यशापासून किती दूर आहोत, याची अनुभूती त्याला झाली. त्यावेळी विकी खूप रडला होता. आता तर, ऑफर लेटरही फाडलं... हेच त्यानं स्वत:ला सांगितलं.
विकी घाबरला होता. पण, त्यानं परिस्थितीपुढे हात टेकले नव्हते. अखेर 2015 मध्ये 'मसान' प्रदर्शित झाला. विकीच्या वडिलांना त्याच्या अभिनयाचं कौतुक करणारे फोन येऊ लागले. जे पाहून ते स्वत: फार आनंदात होते.
पुढे विकी त्याच्या आईला कारच्या शोरुममध्ये घेऊन गेला तो त्याच्यासाठी फार भावनिक क्षण होता. 'तुला आठवतंय, जेव्हा तू लहान होतास त्यावेळी तू दुकानांमध्ये असणाऱ्या कारच्या खेळण्यांकडे बोट दाखवून मला ते हवंय म्हणून हट्ट करायचास आणि आज तू मला स्वत:च्या कारमध्ये बसवतोयस..', असं म्हणत त्याच्या आईनं मनातील भावना व्यक्त केल्या.
विकीसाठीही तो क्षण अतिशय भावनिक होता. टप्प्याटप्प्यानं तो पुढे येत गेला. कलेच्या आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यानं बॉलिवूडमध्ये मोठा चाहतावर्गही निर्माण केला. विकीचा हा प्रवास पाहता, Vicky`s Joshh, High Sir असं म्हणायला हरकत नाही.