मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. अशावेळी लॉकडाऊनमध्ये घरात असलेल्या प्रेक्षकांसाठी झी मराठी सज्ज आहे.
सगळीकडे फक्त संचारबंदीच्याच बातम्या सुरु आहेत, ह्या सर्व नकारात्मक गोष्टीतून बाहेर येण्यासाठी झी मराठी तुमच्या सोबत असणार आहे. कारण आपल्या आवडत्या मालिकांचे नवे भाग सुरूच राहणार आहेत. अविरत मनोरंजन करण्याचा वसा घेत झी मराठी तुमचं मनोरंजन करतच राहणार आहे. कारण मनोरंजन थांबलं नाही, थांबणार नाही ह्याची सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर देखील याचे मिम्स व्हायरल होत आहेत.
महाराष्ट्रात मालिकांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशावेळी चित्रिकरण कसे करावे? हा प्रश्न सगळ्याच निर्माते आणि दिग्दर्शकांसमोर आहे. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी आपली व्यथा सोशल मीडियावर मांडत आहेत.
पण या परिस्थितीत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी मराठीने कंबर कसली आहे. झी मराठीवरील 'पाहिले न मी तुला', 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'माझा होशील ना', 'अग्गबाई सूनबाई', 'देवमाणूस', 'चला हवा येऊ द्या' या मालिकांचं चित्रिकरण आता बेळगाव, गोवा, सिलवासा, दमण आणि जयपूर याठिकाणी होणार आहे.