'ज्याला सावरकर काळे की गोरे हे पण माहिती नाही...', महेश मांजरकेरांनी म्हणून सोडला चित्रपट

 रणदीप हुड्डाने जुन्या गोष्टींबद्दल चर्चा करायची नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता महेश मांजरकेरांनी हा चित्रपट का सोडला, याचे कारण स्पष्टपणे सांगितले आहे. 

Updated: Apr 17, 2024, 05:15 PM IST
'ज्याला सावरकर काळे की गोरे हे पण माहिती नाही...', महेश मांजरकेरांनी म्हणून सोडला चित्रपट title=

Mahesh Manjrekar Left Swatantrya Veer Savarkar Movie : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती, त्यांचं राजकीय व सामाजिक कार्य दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत झळकला. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत 24 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता या चित्रपटाबद्दल मराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाची घोषणा तब्बल दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. पण काही कारणांनी त्यांनी हा चित्रपट सोडला. आता महेश मांजरेकरांनी 'लोकसत्ता' या वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीत हा चित्रपट सोडण्यामागचे कारण सांगितले. रणदीप हुड्डालाही याबद्दल विचारणा करण्यात आली. पण त्याने जुन्या गोष्टींबद्दल चर्चा करायची नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता महेश मांजरकेरांनी हा चित्रपट का सोडला, याचे कारण स्पष्टपणे सांगितले आहे. 

"त्याला वीर सावरकर खलनायक वाटायचे"

"मी ‘वीर सावरकर’ हा चित्रपट सोडला अशा अनेक चर्चा झाल्या. मला वीर सावरकरांचे विचार पटले नाहीत म्हणून मी हा चित्रपट सोडला, अशीही टीकाही झाली. पण यात काहीही तथ्य नाही. मला कायमच ‘वीर सावरकर’ यांच्यावर चित्रपट बनवायचा होता. मला त्यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण होते. मला संदीप सिंह यांनी या चित्रपटाबद्दल विचारणा केली होती आणि त्यानंतर हा चित्रपट करायचं ठरलं. त्यावेळी या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाला घ्यायचं ठरलं. आम्ही जेव्हा रणदीपला भेटलो, तेव्हा त्याला सावरकर काळे की गोरे हे देखील माहिती नव्हते. पण त्याचं श्रेय हे आहे की त्याने सगळा इतिहास वाचून काढला. त्याला सुरुवातीला वीर सावरकर हे खलनायक वाटायचे. पण मी त्याला सांगितलं की तू सगळं वाच. माझ्या सांगण्यावरुन त्याने संपूर्ण इतिहास वाचून काढला. या चित्रपटाची 70 टक्के स्क्रिप्ट माझी आहे", असे महेश मांजरेकरांनी सांगितले. 

"या चित्रपटाचे पहिले वाचन करायला घेतलं, तेव्हा तो हे हवं, ते हवं, असे सांगत हस्तक्षेप करु लागला. स्क्रिप्ट ठरलेली असूनही शूटींग थांबले. त्यामुळे चित्रपटाचे बजेट वाढण्यास सुरुवात झाली. मला तर वाटलं की मी मरेन. कारण चित्रपट वाईट झाला तर लोक मला नावं ठेवतील. वीर सावरकरांवर चित्रपट करायचा आहे तर तो उत्तमच झाला पाहिजे या मताचा मी होतो. त्यावेळी जी परिस्थिती निर्माण झाली ती इतकी नकारात्मक होती की मी निर्मात्याला सांगितलं की एक तर रणदीप हुड्डाला चित्रपट करु दे किंवा मी तरी हा चित्रपट करतो", असे महेश मांजरेकर म्हणाले.

लेखन आणि दिग्दर्शनाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप

"तो रोज एखादी नवीन कल्पना घेऊन यायचा. त्याला त्या सिनेमात भगत सिंग, हिटलर सगळी पात्रं हवी होती. मी चित्रपट पाहिलेला नाही. पण मी त्यात काळ्या पाण्याच्या शिक्षेचे सीन त्याने खूप जास्त केले आहेत असं ऐकलं. त्याने मला जेव्हा हे सांगितलं होतं तेव्हा मी त्याला म्हटलं दोन सीन दाखवले तरीही वीर सावरकरांना काय भोगावं लागलं ते कळतं. त्याला चित्रपटात 1857 चे लोक हवे होते, ‘इन्कलाब जिंदाबाद’ वगैरे म्हणताना. त्यावेळी मी रणदीपला म्हटलं की आपण वीर सावरकरांवर चित्रपट करतो आहेत. त्यामुळे आपलं मुख्य लक्ष हे वीर सावरकरांवर असायला हवे. त्यानंतर तो लेखन आणि दिग्दर्शनाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करु लागला. हा सीन असा करायचा, तो सीन असा शूट करायचा, असे तो सांगू लागला. रणदीपला भेटायला जावं तर तो वीर सावरकरांच्या वेशात बसलेला असायचा. मला तो हे सर्व जाणीवपूर्वक करत असल्याचे लक्षात आले", असेही महेश मांजरेकर म्हणाले. 

"यानंतर मग मी निर्मात्याला सांगितलं की तू त्याला निवड किंवा मला निवड कारण मला हवाय तसा चित्रपट याच्याबरोबर (रणदीप हुड्डा) होऊ शकत नाही. मी उत्तम चित्रपट केला असता, जर रणदीप हुड्डा त्यात नसता तर, असे महेश मांजरकेरांनी म्हटले. रणदीप हुड्डाने वीर सावरकरांबद्दल वाचलं नाही का? तसं मुळीच नाही त्याने माझ्या तीनपट सावरकर वाचले आहेत. पण त्याने फक्त वाचन केले आहे. त्यातून कोणताही बोध घेतलेला नाही. त्यामुळेच मी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला", असे स्पष्टीकरण महेश मांजरेकरांनी दिले.