Actress Mamta kulkarni Return To India after 25 Years: सलमान खान आणि शाहरुख खानच्या 'करण-अर्जून' चित्रपटामध्ये अभिनेत्री कालोजबरोबर सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारणारी ममता कुलकर्णी मायदेशी परतली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात 2 हजार कोटी रुपयांच्या अंतरराष्ट्रीय कटामध्ये सहभागी असल्याच्या प्रकरणामधून क्लिनचीट मिळाल्यानंतर ही अभिनेत्री मुंबईत परतली आहे. तब्बल 25 वर्षींनी ही अभिनेत्री मायदेशी परतली आहे. बुधवारी या अभिनेत्रीनेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपण भारतात परतल्याची माहिती दिली. भारतात परतल्यानंतर आपल्याला फार भरुन आल्यासारखं वाटत असून आपण भावूक झालो आहोत असं म्हणत तिने मुंबईचा 'आमची मुंबई' असा उल्लेख केला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये ममता कुलकर्णी, "हाय गाइज, मी ममता कुलकर्णी बोलतेय! मी नुकतीच भारतात, बॉम्बेमध्ये म्हणजेच 'आमची मुंबई'मध्ये तब्बल 25 वर्षानंतर परतले आहे. अनेक जुन्या आठवणी दाटून आल्या आहेत. मी 2000 साली भारतातून बाहेर गेली होती. त्यानंतर 2024 मध्ये मी इथे पुन्हा परत आले आहे. मला सध्या फार भरुन आल्यासारखं आणि भावूक झाल्यासारखं वाटत आहे. मला नेमकं कसं व्यक्त व्हावं हे कळत नाहीये," असं म्हटलं आहे. "विमान उतरण्याआधी मी माझ्या डावीकडे आणि उजवीकडे पाहत आहे. मी माझा स्वत:चा देश 25 वर्षानंतर असा आकाशातून पाहिला आहे. मी फार भावूक झाली असून माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर पाऊल ठेवल्यानंतर मला फारच भरुन आलं आहे," असंही ममता कुलकर्णीने म्हटलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जीला 2016 साली समोर आलेल्या ठाण्यातील एका अंमली पदार्थ तस्करी प्रकरणामधून निर्दोष मुक्त केलं. या प्रकरणामध्ये ममताचा जोडीदार विक्की गोस्वामी हा सहआरोपी होता. विकीने केनियामध्ये सदर तस्करीसंदर्भातील एक बैठकीला हजेरी लावली होती, असा ठपका ठेवत अभिनेत्रीवरही आरोप करण्यात आलेला. या प्रकरणात अभिनेत्रीचाही सहभाग असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला होता. त्यामुळेच तिला केनियामधून पुन्हा भारतात आणून चौकशी करण्याची मागणी मुंबई पोलिसांनी केलेली. मात्र कोर्टाने ममताला निर्दोष मुक्त केल्यानंतर ती भारतात परतली आहे.
"केवळ मी ज्याच्याबरोबर रिलेशमध्ये आहे त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याने आपलाही त्या गुन्ह्याशी संबंध आहे असं म्हणता येणार नाही," असा युक्तीवाद ममताने तिच्या याचिकेमधून केला होता. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर ममताचं नाव या प्रकरणातून वगळण्याचे आदेश दिले.