Sayaji Shinde Angioplasty First Reaction : मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने घराघरांत पोहोचलेले अष्टपैलू अभिनेते म्हणून सयाजी शिंदे यांना ओळखले जाते. सयाजी शिंदे यांच्या छातीत दुखू लागल्याने गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही तासांपूर्वी सयाजी शिंदे यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. यामुळे अनेक चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले होते. यानंतर आता सयाजी शिंदे यांचा रुग्णालयातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ते स्वत: त्यांच्या तब्ब्येतीची माहिती देताना दिसत आहे.
सयाजी शिंदे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ते रुग्णालयातील बेडवर झोपल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या हातावर सलाईनसाठी लावलेल्या काही पट्ट्या दिसत आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी त्यांच्या तब्ब्येतीबद्दल सांगितले आहे. 'नमस्कार, मी एकदम व्यवस्थित आहे. माझ्यावर प्रेम करणारे सर्व रसिक, माझे हितचिंतक सर्वांच्या शुभेच्छा माझ्यासोबत असतात. आता काळजी करण्यासारखं काही नाही, लवकरच तुमच्या मनोरंजनासाठी उपस्थित राहीन धन्यवाद!' असे कॅप्शन सयाजी शिंदे यांनी दिले आहे.
त्यासोबत त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत ते म्हणाले, "नमस्कार, माझे जे सर्व प्रेक्षक-हितचिंतक आहेत, त्यांच्या मला खूप शुभेच्छा आल्या. त्या सर्वांना मला एक सांगायचं आहे की, माझी तब्येत चांगली आहे. खबरदारी म्हणून काही दिवसांपूर्वी मी तपासणी केली होती. त्यावेळी हृदयात एक ब्लॉकेज होतं, जे आता अगदी सहजरित्या निघालं. म्हणजे पुढे कधीतरी मला हृदयविकाराचा झटका येऊ शकला असता, असे ते होते. मात्र आता काहीही होणार नाही.
दहा वर्ष मी खूप चांगलं काम करणार आहे आणि आपल्या सेवेत परत येणार आहे. मी विविध गमंती-जमती इन्स्टाग्राम, युट्यूबवर शेअर करेनच. त्यामुळे कोणतीही काळजी करू नका. तुम्ही ज्या सगळ्या बातम्या ऐकल्या आहात, त्या अगदी तशाच्या तशा नाही. मी चांगला आहे, आनंदित आहे. तर तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद!", असे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान सयाजी शिंदे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. सोमनाथ साबळे यांनीही त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी आणि काही चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये हृदयाच्या एका रक्तवाहिनीत ब्लॉक असल्याचं समजल्यानंतर सयाजी शिंदे यांच्यावर तात्काळ अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, असे डॉ. सोमनाथ साबळे यांनी सांगितले.