Nivedita Saraf Emotional Serial Off Air : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मोठ्या ब्रेकनंतर मराठी मालिकाविश्वात पदार्पण केले. निवेदिता सराफ यांनी झी मराठीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत त्यांनी आसावरी हे पात्र साकारले होते. त्यानंतर आता गेल्या काही वर्षांपासून भाग्य दिले तू मला या मालिकेत झळकत होत्या. मात्र आता त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. त्यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
निवेदिता सराफ यांनी गेली अनेक वर्ष विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहेत. निवेदिता सराफ यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. निवेदिता सराफ यांनी 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. निवेदिता यांनी या मालिकेत राजच्या आईचे पात्र साकारले होते. आता त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
"बाय बाय रत्नमाला मोहिते, मला ही व्यक्तिरेखा साकारताना खूप खूप आनंद झाला. हा एक अप्रतिम अनुभव होता. मला कोणताही प्रोजेक्ट संपताना खूप वाईट वाटते. मी यात एका खंबीर स्त्रीचे पात्र साकारत होते. पण आता मी हे सर्व मिस करणार आहे. पण आमचे निर्माते विद्याधर पठारे, प्रोजेक्ट हेड मनीष दळवी, दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, दिग्दर्शक सागर खेऊर, लेखक अमोल पाटील, चेतन शेंगदाणे, मुग्धा गोडबोले यांचे खूप खूप आभार.
त्यासोबतच माझे सहकलाकार विवेक सांगळे, तन्वी मुंडले, सुदेश म्हशीलकर, नंदिनी वैद्य, अमित रेखी, निलेश रानडे, जान्हवी किल्लेकर इतर सर्व अभिनेते आणि तंत्रज्ञ तुमचेही खूप खूप आभार. कलर्स मराठी टीम केदार शिंदे, सोजल सावंत, मयुरेश वाघे तुम्हालाही धन्यवाद", असे निवेदिता सराफ यांनी म्हटले आहे.
दरम्यान कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. शनिवारी 20 एप्रिल 2024 रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. ही मालिका कन्नड मालिका कन्नदतीचा रिमेक होती. यात अभिनेत्री तन्वी मुंडले, अभिनेता विवेक सांगळे आणि निवेदिता सराफ हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. ही मालिका 2022 मध्ये सुरु झाली. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता जवळपास दोन वर्षांनी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.