मुंबई : पूर्वापार चालत आलेले चित्रपट आणि त्यातून अनेकदा दाखवण्यात आलेली पात्र नकळतच आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करत राहिली. अशाच पात्रांमध्ये नणंद- भावजयीचं नातंही काहीसं तेढ निर्माण होईल अशाच पद्धतीनं दाखवण्यात आलं. नणंद कजाख आणि भावजय कचाकचा भांडणारी, असं चित्रण तुम्हीही बऱ्याचदा चित्रपटांमधून पाहिलं असेल.
नात्यांच्या याच गोतावळ्यात एक हेवा वाटेल असं नातं सध्या सर्वांची मनं जिंकत आहे. इथं कूल वहिनी आहे, हॉट अॅण्ड बोल्ड नणंदही आहे. यांची जोडगोळी म्हणजे कुटुंबातील एक कमाल समीकरण बरं.
लाडक्या वहिनीशी असणारं हेच सुरेख नातं अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. (Urmila nimbalkar you tube channel )
आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांच्या पत्नी अनुजा, म्हणजेच आपल्या वहिनीसोबतं नातं नेमकं कसं आहे हे सांगताना उर्मिलानं जुने फोटो पोस्ट करत त्याला साजेसं कॅप्शनही लिहिलं आहे.
'आत्तापर्यंत किमान १०० जणांनी आम्हाला बहिणी म्हटलं असेल. विनाकारण समाज निर्मित व्याख्येप्रमाणे नाती जगायला लागलं की उगीचच तिढे तयार होतात. हि नंणंद, ती भावजय असल्या फंदात न पडता, वेळेत मैत्री करुन लवकरात लवकर त्या व्यक्तीला आपलंसं केलं की,पटापट ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा भाग होते आणि खुप genuine प्रेमावर नातं पुढे सरकत राहतं.
प्रचंड हुशार, नम्र, प्रेमळ आणि खतरनाक आवाज असलेली अनुजा माझी खुपच जवळची मैत्रीण आहे. आज हा अचानक सापडलेला जुना फोटो पाहून आम्ही किती सतत आनंदात, सहज, मैत्रीत वावरत असतो हे लक्षात आलं. लय फास्ट संपतं आयुष्य, भांडत बसायलाही वेळ नाही दवडायला पाहिजे. इतकं cool असल्याबद्दल thank you', असं उर्मिलानं लिहिलं.
वहिनीसाठी एका नणंदेनं लिहिलेली ही पोस्ट त्यांच्या नात्यांचा ओलावा आणि एकमेकींप्रती असणारी आदराची भावना सुरेखरित्या आपल्यासमोर मांडत आहे.