मुंबई : काही कलाकृती निव्वळ नफा कमवून देतात तर, काही कलाकृती या साऱ्यासोबतच कलाकाराला आपलेपणाची जाणीव आणि प्रेम मिळवून देतात. सध्या अभिनेता प्रसाद ओक असाच अनुभव घेताना दिसत आहे. कारण, तो एक अभिनेता असूनही माणसातला देव म्हणूनच अनेकांसमोर येत आहे. निमित्त आहे ते म्हणजे त्याचा आगामी चित्रपट, 'धर्मवीर'. (dharmaveer prasad oak)
शिवसेना नेते आणि ठाण्यामध्ये ज्यांच्या नावाचा आजही दबदबा आहे, अशा आनंद दिघे या बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासार्ह आणि कट्टर शिवसैनिकाच्या आयुष्यावर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. (Marathi news)
अभिनेता प्रसाद ओक यानं या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. भूमिकेसाठी प्रसादनं घेतलेली मेहनत त्याच्या नजरेला नजर देतानाच लक्षात येते.
मोठ्या पडद्यावर आनंद दिघे साकारणं तितकं सोपं नव्हतं. पण, प्रसादनं हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानं दिघेसाहेबांच्या फोटोमध्ये त्यांच्या डोळ्यांचं निरिक्षण करण्यास सुरुवात केली.
व्हॅनिटी वॅनमध्ये असताना फक्त दिघे.... इतकंच काय ते त्याच्या मनात असायचं. अनेकदा त्यांच्या फोटोकडे पाहत असताना ते आपल्या आसपासच आहेत असाच भास त्याला होत होता. नकळकत त्यांचं अस्तित्वं प्रसादला स्वत:मध्ये जाणवू लागलं आणि नकळतच दिघे यांनीच प्रसादमार्फत ही भूमिका साकारून घेतली.
चित्रपटात आनंद दिघे साकारणं हा विलक्षण अनुभव असल्याचं सांगत एक कलाकार म्हणून आपण नेमके किती भारावलो, हे प्रसादनं माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.