लग्नाच्या सैराट चर्चांविषयी अखेर रिंकूचा खुलासा

तिचा हा एकंदर अंदाज पाहता 

Updated: Jun 24, 2019, 03:15 PM IST
लग्नाच्या सैराट चर्चांविषयी अखेर रिंकूचा खुलासा
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच सर्वांची लाडकी 'आर्ची' ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेचा विषय ठरली होती. निमित्त होतं ते म्हणजे रिंकूचे फोटो. हे फोटो होते चक्क वधूरुपातील रिंकूचे. तिचा हा एकंदर अंदाज पाहता रिंकू लग्न करत असल्याच्या चर्चांन जोर धरला. 

बस्स.... आर्चीची लगीनघाई..... असं म्हणत साऱ्यांनीच मोठ्या कुतूहलाने शक्य त्या सर्व माध्यमांतून रिंकूच्या लग्नाविषयीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर खुद्द रिंकूनेच या चर्चांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. एका अर्थी या चर्चांना पूर्णविराम दिला. 

झी टॉकीज कॉमेडी अव़ॉर्ड्स या सोहळ्याच्या निमित्ताने रिंकूशी संवाद साधला असता त्याचवेळी तिने याविषयीची माहिती दिली. फोटो व्हायरल झाल्यामुळे तुझ्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे, असं म्हटलं असता रिंकूला हसू आवरलं नाही. 'असं काहीच नाही आहे. सध्याच्या घडीला मी शिक्षण पूर्ण करत आहे आणि सध्या तेच सुरु आहे', असं ती म्हणाली. 

आपण लग्नाच्या बेडीत अडकणार नसल्याचं म्हणत रिंकूने अखेरच या चर्चा शमवण्याचं काम केलं. हे पाहता तिच्या चाहत्यांच्या मनात घर करणारे असंख्य प्रश्नही थांबले असतील हे खरं. 

काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेत रिंकू उत्तीर्ण झाली. अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यामागचं रहस्यही तिने यावेळी सांगितलं. मधल्या काळात आपल्या हाताशी कोणताही चित्रपट नसल्यामुळे अभ्यासाला पुरेसा वेळ देता आता होता, त्याचंच हे फळ मिळाल्याचं ती म्हणाली. 'सैराट'मुळे प्रसिद्धीझोतात आलेली रिंकू येत्या काळात काही बहुविध चित्रपटांमध्ये झळकणार यात शंकाच नाही. तूर्तास ती हे सर्व वातावरण आणि एकंदरच चाहत्यांकडून मिळणारं अमाप प्रेम या साऱ्याचा आनंद घेत आहे.