मुंबई : कोकणची संस्कृती, मालवणी बाज आणि एका गूढ कथानकासह दुसऱ्यांदा प्रेक्षकांच्या भेटाला आलेली 'रात्रीस खेळ चाले २' ही मालिका आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला मिळालेली लोकप्रियता पाहता कथानत अतिशय रंजक वळणावर आणत पुन्हा त्याच वळणावरुन या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाती सुरुवात करण्यात आली.
'अण्णा नाईक', 'शेवंता', 'इंदू', 'माधव', 'दत्ता', 'पांडू', 'सुषल्या' अशा पात्रांच्या भूतकाळात डोकावण्याती संधी या मालिकेच्या दुसऱ्या पर्वामुळं मिळाली. सोबतच आण्णा नाईकांच्या क्रूर रुपाची झलकही प्रेक्षकांना पाहता आली. मालिकेचं दुसरं पर्व विशेष गाजलं ते म्हणजे अर्थातच गूढ कथानकामुळं आणि शेवंतासोबतच्या अण्णांच्या केमिस्ट्रीमुळं. शेवंताच्या अदाकारीनं या मालिकेत वेगळं असं स्थान निर्माण केलं.
लॉकडाऊनच्या काळात मालिकेला काही काळ प्रेक्षकांपासून दुरावा पत्करावा लागला होता. पण, पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि रहस्यमयी कथानकानं 'रात्रीस खेळ चाले २' प्रसारित झाली. या मालिकेची ही साथ आता अवघ्या काही दिवसांचीच आहे. कारण, ३१ ऑगस्ट रोजी ही मालिका अखेरच्या भागासह प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
मालिकेच्या दोन्ही पर्वांना लोकप्रियता मिळाल्यानंतर आता हा गूढ अध्याय इथंच थांबणार आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर 'देवमाणूस', ही नवी मालिका झी मराठीवर दाखवण्यात येणार आहे. नव्या मालिकेची उत्सुकता असेलच. पण, आता 'रात्रीस खेळ चाले २' चा शेवट नेमका कोणत्या वळणावर होणार याचंच कमालीचं कुतूहल पाहायला मिळत आहे.