मुंबई : आपल्या कप सॉंगमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेली आणि त्यानंतर ‘मुरांबा’ या मराठी सिनेमातून घराघरात पोहोचलेली इंटरनेट सेन्सेशन मिथीला पालकर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे मिथीला पालकर ही मल्याळम स्टार डलक्यूअर सलमान आणि इरफान खान याच्यासोबत काम करणार आहे. मिथीलासाठी ही मोठी संधी मानली जात आहे. मल्याळम सिनेमांमधील सुपरस्टार डलक्यूअर सलमान हा सुद्धा या सिनेमातून हिंदी सिनेमात पदार्पण करीत आहे. इरफान खान आणि मिथीला यात असल्याने या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. आता यात मराठमोळ्या मिथीलाला काय भूमिका असणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
प्रसिद्ध निर्माते रॉनी स्क्रूवाला या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. त्यात मिथीलाला संधी देण्यात आली आहे. हा एक कॉमेडी सिनेमा असल्याचे समोर आले आहे. मात्र, या सिनेमाचं टायटल अजून ठरलेलं नाहीये. या सिनेमाचं दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक आकर्ष खुराणा हा करणार असून याचं लेखन हुसेन दलाल करणार आहे. हुसेन दलाल याने याआधी ‘ये जवानी है दिवानी’, ‘२ स्टेट्स’ सारख्या सिनेमांचं लेखन केलं आहे. ऑगस्टच्या शेवटपर्यंत या सिनेमाचं काम सुरू होणार आहे. याआधी या सिनेमासाठी अभिषेक बच्चनला फायनल करण्यात आले होते. मात्र त्याच्या आगामी ‘फलटन’ शूटींगमुळे त्याच्या डेट्स जुळून आल्या नाहीत.
मराठमोळी मिथीला ही वेब सीरीजमधून सोशल मीडियात चांगली लोकप्रिय झालेली आहे. त्यानंतर मराठी सिनेमातून तर तिने सर्वांनाच चकीत केले आहे. यासोबतच तिच्या कप साँगनेही अनेकांना वेड लावले आहे. त्यामुळे आता ती हिंदीत काय जादू दाखवणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. तिला इतक्या मोठ्या स्टार्ससोबत हिंदी सिनेमात करायला मिळतंय त्यामुळे तिच्यासोबतच तिच्या चाहत्यांमध्येही ही मोठी गोष्ट आहे.