मुंबई : उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले की,सिनेमाच्या स्क्रिनिंग अगोदर राष्ट्रगीत वाजविणे अनिवार्य नाही.
या न्यायालयाच्या निर्णयाचा निर्माते मुकेश भट यांनी स्वागत केलं. आणि या पाठोपाठच त्यांनी अभिनेत्री सनी लिओनी हिच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, तुम्ही सनी लिओनीचा चित्रपट बघायला जात असाल तर आॅडिटोरियममध्ये तुम्ही राष्ट्रगीत कसे वाजवू शकता? अर्थात इतर चित्रपटांबद्दलही माझा हाच प्रश्न आहे.
मुकेश भट्ट यांनी पुढे म्हटले की, मनोरंजन स्थळी राष्ट्रगीताच्या सन्मानाबद्दल एकप्रकारे समझोताच झाला होता. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निर्णय माझ्यादृष्टीने खूप महत्त्वपूर्ण असून, आम्ही त्याचा आदर करतो. या निर्णयामुळे राष्ट्रगीताला सन्मान मिळेल, अशी अपेक्षा करतो.
मुकेश भट्ट महेश भट्ट यांचे भाऊ आहेत. त्यांनी १९९० मध्ये पहिल्यांदाच विनोद खन्ना स्टारर ‘जुर्म’ या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी ‘आशिकी, दिल है की मानता नहीं, नाजायज, गुलाम आणि संघर्ष यांसारख्या चित्रपटांवर काम केले. त्याचबरोबर त्यांनी ‘राज, राज - द मिस्ट्री कंटिन्यूअस’ यांसारखे हॉरर आणि ‘कलयुग, गैंगस्टर आणि तुम बिन’ या चित्रपटांवरही काम केले. २०१६ मध्ये त्यांनी ‘लव गेम्स’ हा बोल्ड चित्रपट भाऊ महेश भट्ट यांच्यासोबत प्रोड्युस केला.
दरम्यान, मुकेश भट्ट यांचे बंधू महेश भट्ट यांनीच सनी लिओनीला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला. जेव्हा सनी बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती, तेव्हा महेश भट्ट यांनी तिला बॉलिवूडमध्ये आणण्याचे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी ‘जिस्म-२’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आणले. सध्या सनीला बॉलिवूडमध्ये ‘आयटम गर्ल’ या नावाने ओळखले जाते.