मुंबई : आज फरहान अख्तरचा वाढदिवस...
एक उत्कृष्ठ निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून फरहान अख्तरकडे पाहिलं जातं. या तिन्ही गोष्टींबरोबरच तो चांगला गायक देखील आहे. रॉक ऑन, जिंदगी ना मिलेगी दोबारा, कार्तिक कॉलिंग कार्तिक यासारख्या सिनेमांमध्ये फरहान अख्तरने काम केलं आहे. मात्र एका सिनेमात अभिनय केल्याचा आजही त्याला पश्चाताप आहे. आणि तो सिनेमा म्हणजे रंग दे बसंती.
रंग दे बसंती या चित्रपटात आमिर खानने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तुम्हाला माहीत आहे का, आमिरच्या आधी या चित्रपटाची ऑफर फरहान अख्तरला देण्यात आली होती. पण काही कारणास्तव त्याने या चित्रपटाला नकार दिला. पण आजही या गोष्टीचा फरहानला पश्चाताप वाटतो.
फरहान अख्तरच्या मते दीवार हा सगळ्यात चांगला चित्रपट आहे. फरहानला चित्रपटाविषयी प्रचंड प्रेम असल्याने तो चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अनेक तास चित्रपट पाहण्यात घालवत असे. शोले हा चित्रपट तर त्याने आजवर ५० पेक्षा देखील अधिक वेळा पाहिला आहे. फरहान हा प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. तो खूपच लहान असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. फरहानचा ९ जानेवारीला म्हणजेच आज वाढदिवस असून त्याचा जन्म मुंबईतील आहे. जावेद अख्तर यांच्या नावाचा वापर न करता त्याने बॉलिवूडमध्ये आज त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे.
फरहानने खूपच कमी वयात बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. फरहान त्याच्या आईचा प्रचंड लाडका आहे. पण लहानपणापासून तो त्याच्या आईला प्रचंड घाबरायचा. त्याच्या आईने त्याला एकदा सांगितले होते की, आयुष्यात तू यश मिळवू शकला नाहीस तर तुला मी घराच्या बाहेर काढेन. त्यामुळे आयुष्यात काहीतरी बनायचे असे त्याने लहानपणीच ठरवले होते. फरहानने कॉलेजमध्ये असतानाच त्याचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. रितेश सिडवानी हा फरहानचा खूप चांगला मित्र असल्याने त्याने त्याचे प्रोडक्शन हाऊस रितेशसोबत सुरू केले. या प्रोडक्शन हाऊसने आजवर रईस, दिल धडकने दो, जिंदगी न मिलेगी दोबारा यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.