मुंबई : सोशल मीडिया जितकं चांगलं आहे तितके त्याचे काही वाईट परिणामही आहेत. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कलाकाराच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत असते. अशाच प्रकारे ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. यावर मुमताज यांच्या कुटुंबियांनी त्या पूर्णपणे ठीक असल्याचं सांगितलं आहे. परंतु मुमताज यांच्या कुटुंबियांनी अशाप्रकारे खोट्या अफवा का पसरवल्या जात आहेत? असा सवालही केला आहे.
मुमताज यांच्या कुटुंबातील सदस्याने मुमताज जिवंत आणि निरोगी असल्याच सांगत त्यांना जाणून घ्यायचं आहे की त्यांच्याबद्दल अशाप्रकारे अफवा का पसरवल्या जात आहेत असं म्हटलं आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातही मुमताज यांच्या निधनाच्या बातमीची अफवा पसरवण्यात आली होती. त्यावेळी मुमताज यांची लहान मुलगी तान्या माधवानीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत त्या पूर्णपणे ठीक असल्याचं सांगितलं होतं.
मुमताज ७० वर्षांच्या असून आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये राहत आहेत. मुमताज यांनी मयूर माधवानी यांच्या लग्न केलं होतं. त्याच्या मोठ्या मुलीचं नाव नताशा असून तिने फरदीन खानशी लग्न केलं. ६०च्या दशकात मुमताज बालकलाकार म्हणून काम करत होत्या त्यानंतर त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. १९७०च्या प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांनी मेला, अपराध, नागिन, ब्रम्हचारी, राम और श्याम, दो रास्ते, फौलाद, वीर भीमसेन. सिकंदर-ए-आजम, खिलौना यांसारख्या चित्रपटातून आपल्या अदाकारीने चित्रपटसृष्टीत दमदार कामगिरी केली आहे.