'राज काल माझा होता, आज-उद्याही राहील'

अवैध फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता.

Updated: Jan 22, 2018, 06:44 PM IST
'राज काल माझा होता, आज-उद्याही राहील' title=

मुंबई : अवैध फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता. पण आता या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न नाना पाटेकर यांनी केला आहे. राज ठाकरे काल माझा होता, आजही आहे आणि उद्याही राहील, असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलं आहे.

नाना पाटेकर यांचा आपला मानूस हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी नानांनी राज ठाकरेंबद्दल ही प्रतिक्रिया दिली. राज माझा चित्रपट बघणार नाही असं होणार नाही. त्यावेळी मी रागात बोललो होतो. रागात बोललो म्हणून कुणी आपला माणूस सोडतो का? असं नाना पाटेकर राज ठाकरेंविषयी बोलले.

नेमका काय होता वाद?

एलफिन्सट्न स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतल्या अवैध फेरीवल्यांविरोधात आंदोलन सुरु केलं. नाना पाटेकर यांनी मनसेने फेरीवाल्यांच्याप्रती घेतलेल्या भूमिकेवर आपलं मत मांडलं होतं. भाकरीसाठी धडपणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करू नये. ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावं,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी नानांच्या वक्तव्यावर टीका केली होती.

आंदोलन केले की अभिनेता नाना पाटेकर फेरीवाल्यांच्या बाजुने बोलतो. आज दोन सिनेमावर बंदी घातली घेतली, त्यावर आता नाना बोलत नाही. आता गप्प का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानांना विचारला होता. 

इफीमध्ये दोन मराठी सिनेमांना बंदी घातली त्यावर का नाही नाना पाटेकर बोलले? आता बोल की, असं सांगत आम्हाला काय करायचे ते नानाने शिकवू नये, असा सल्ला राज ठाकरे यांनी नानाला दिला होता.

नानानंही दिलं होतं प्रत्युत्तर

‘प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं,” असेही नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं होतं.