Neerja Bhanot Amul AD: अमूलच्या एका जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जाहिरातीत दिसणाऱ्या या तरुणीचा चेहरा पाहताच नागरिकही थक्क झाले आहेत. 1986 साली जीवावर उदार होऊन बुद्धिमत्तेच्या जोरावर या तरुणीने 300 पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवले होते. वयाच्या 23व्या वर्षीच तिला वीर मरण आले. आपल्या वाढदिवसाच्या फक्त 2 दिवसांआधीच तीने जगाला अखेरचा निरोप दिला. अमूलच्या जाहिरातीत दिसणारी ही तरुणी म्हणजे भारताची शूरकन्या निरजा भानोत आहे.
अमूलची ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. या जाहिरातीत निरजाने आईची भूमिका साकारली होती. आई आणि मुलगा यावर ही एक जाहिरात होती. योगायोग म्हणजे, जाहिरातीतील मुलगा खेळण्यातील विमान उडवत होता. मुलगा खेळत खेळत निरजाजवळ येतो आणि ती त्याला अमूलचे चॉकलेट देते. लोकांनी सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक कमेंट्स केले आहेत. तर, निरजाला जाहिरातीत पाहून आश्चर्यचकितदेखील झाले आहेत.
निरजाचा जन्म चंदिगढ येथे झाला होता. शिक्षणासाठी म्हणून ती मुंबईत आली. निरजाची आई गृहिणी होती तर वडील पत्रकार क्षेत्रात होती. वडिलांनी नोकरी मुंबईत असल्याकारणाने निरजा कॉलेजसाठी मुंबईतच आली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मार्च 1985 साली तिचे लग्न झाले व पतीसोबत ती गल्फमध्ये स्थायिक झाली. मात्र, हुंडा मागणीच्या दबावामुळं ती दोन महिन्यातच माहेरी परत आली. त्यानंतर पॅन अॅम या विमान कंपतील परिचारिका (Air Hostes) साठी अर्ज दिला. काही दिवसांनी ती पॅनअॅममध्ये पर्सर म्हणून रुजू झाली होती.
5 सप्टेंबर 1986 रोजी सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबईहून निघालेल्या विमानाचे अपहरण केले. त्याच दुर्दैवी विमानात निरजा भानोत होती. दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू असताना तीन मुलाना गोळीबारापासून वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या अंगावर गोळ्या झेलल्या त्यातच तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी निरजाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडून अनेक प्रवाशांना बाहेर निघून जाण्यास मदत केली पण ती मात्र स्वतः इतरांच्या मदतीसाठी मागे राहिली. निरजा भानोतच्या या शूरकार्याची दखल अमेरिकेसह पाकिस्ताननेही घेतली. भारत सरकारने तिला मरणोत्तर अशोक चक्र प्रदान केले. अशोक चक्र' या पुरस्कारासोबतच नीरजाला 'फ्लाइट सेफ्टी फाउंडेशन हिरोइजम अवॉर्ड', 'यूएसए', 'तमगा-ए-इंसानियत-पाकिस्तान', 'जस्टिस फॉर क्राइम्स अवॉर्ड', 'यूनाइटेड स्टेट्स अटॉर्नीज ऑफिस फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया', 'स्पेशल करेज अवॉर्ड', या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मॉडेलिंगमध्येही करिअर
हवाई सुंदरी बनण्याआधी निरजाने मॉडेलिंगमध्ये करिअर केले होते. तिनं बेंजर साडी, बिनाका टूथपेस्ट, गोदरेज बेस्ट डिटरजेंट आणि विको टरमरिक क्रीम सारख्या उत्पादनाची जाहिरात केली होती.