नवी दिल्ली : भारतीय कलाविश्वात मुख्यत्वे नाट्यवलयामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान देणाऱ्या आणि कलाविश्वाचा भक्कम पाया म्हणून ओळख असणाऱ्या ज्येष्ठ नाट्यकर्मी Ebrahim Alkazi इब्राहिम अलकाझी यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं. नवी दिल्ली येथील एस्कॉर्ट्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांचा मुलगा फैजल अलकाझी यांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली.
मुंबईत, १९४०-५० च्या दशकामध्ये भारतीय नाट्यविश्वात वेगळी क्रांती आणणारे रंगकर्मी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. वयाच्या ३७ व्या वर्षी अलकाझी दिल्लीत आले. जिथं त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच एनएसडीचं संचालकपद भूषवलं. १९६२ ते ७७ या पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ काळासाठी त्यांनी ही संचालक पदाची जबाबदारी पार पाडलीय. आतापर्यंतच्या एनएसडीच्या इतिहासात इतका मोठा कार्यकाळ असणारे ते संस्थेचे एकमेव संचालक ठरले.
संचालकपदी असताना त्यांनी आधुनिक भारतीय नाट्यक्षेत्र, पारंपरिक भाषा आणि शब्दसंपदा यांसारख्या अभ्यासक्रमांना आकारास आणण्यास मोलाचं योगदान दिलं. मुंबईत त्यांनी ग्रीक ट्रेजेडी, शेक्सपिअर, हेन्रिक इब्सेन, चेकोव आणि ऑगस्ट स्ट्रींगबर्ग यांचं अतिशय प्रभावी सादरीकरण केलं.
The true architect of the Modern Indian Theatre. The Doyen who possessed the extreme knowledge in all the aspects of ART. The magician who nurtured many greats of theatre.
May your brightest spark from the heaven keeps us enlightening #EbrahimAlkazi
#RIP pic.twitter.com/PjYxRybpSr— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) August 4, 2020
कालांतरानं त्यांनी संचालक पदाचा आणि नाट्य विश्वाचा त्याग करत नवी दिल्लीत त्यांनी एक नवी सुरुवात केली. पण, कलेशी मात्र त्यांची नाळ तुटली नव्हती. अलकाझी यांच्या निधनाचं वृत्त कळतात कलाकारांनीही त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करत, त्यांच्या योगदानाप्रती आदराची भावना व्यक्त करत इब्राहिम अलकाझी यांना श्रद्धांजली वाहिली.