मुंबई : ऑस्कर अकादमी अर्थात 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स अँड सायन्स'च्या अध्यक्षपदी असणाऱ्या जॉन बेली यांनी भारतीय चित्रपटांविषयी एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. भारतीय चित्रपट जगताला त्यांच्या कक्षा रुंदावण्याची गरज असल्याचं मत त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमात मांडलं. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांनाच विचार करण्यास भागही पाडलं.
'भाषा, पुराणकथा, संस्कृती यांच्यातील विविधतेमुळे भारतीय चित्रपटसृष्टी ही अतिशय समृद्ध आहे. पण, त्यातील अधिकांश चित्रपट हे सांगितीक कल्पनांमध्येच गुंफलेले असतात. त्यातून सांस्कृतिक मुल्यांची फार माहिती मिळतेच असं नाही', असं ते म्हणाले. यावेळी बेली यांची पत्नी कॅरोल लिटलेटन यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.
सध्याच्या क्षणाला आपण इतकंच सांगू शकतो की, भारतीय चित्रपट विश्वाविषयी आम्हाला फार माहिती नाही. यात आमचाही दोष नाही. कारण, तुमची पाळंमुळं कुठे रोवली गेली आहेत विषयी अधिक माहिती देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली जाणं, असे चित्रपट साकारले जाणं अतिव महत्त्वाचं आहे, ही बाब त्यांनी यावेळी प्रकर्षाने पुढे केली. तुम्ही साकारलेले चित्रपट हे जगात पाहिले जातील अशाच दर्जाचे असावेत असंही ते म्हणाले.
भारतात विशेषत: मुंबईत अकादमीचं कार्यालय सुरू करण्याच्या संकल्पनेलाही त्यांनी दुजोरा दिला. यावेळी त्यांनी दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीत साकारल्या जाणाऱ्या चित्रपटांचा आकडाही नमूद केला. जवळपास १, ८०० चित्रपट प्रतिवर्षी भारतीय काविश्वात साकारले जात असल्याची माहिती देत हॉलिवूडच्या तुलनेत हा आकडा चौपट असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता बेली यांनी दिलेले हे सल्ले आणि त्यांचं निरिक्षण पाहता भारतीय चित्रपटसृष्टीतून त्यावर काही भूमिका घेतल्या जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.