मुंबई : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांची वडील पं. मोतीलाल नेहरु यांच्यावर अभिनेत्री पायल रोहतगीने टिपणी केली होती. त्यामुळे अभिनेत्री पायल रोहतगीला तुरूंगवास वाढला आहे. राजस्थानच्या बूंदी न्यायालयाने पायलच्या न्यायालयीन कोठडीत २४ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल रविवारी तिला अटक केली होती. पायलला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर बॉलिवूडची अभिनेत्री कोयना मित्रा आणि दिग्दर्शिका रीमा कागती तिच्यासाठी उभ्या राहिल्या आहेत.
टेलिव्हिजनवरील रिऍलिटी शो 'बिग बॉस'मधून प्रसिद्धीझोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी अनेकदा तिच्या काही ना काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अटक झाल्याची माहिती स्वत: पायलने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
I am arrested by @PoliceRajasthan for making a video on #MotilalNehru which I made from taking information from @google Freedom of Speech is a joke @PMOIndia @HMOIndia
— PAYAL ROHATGI & Team- Bhagwan Ram Bhakts (Payal_Rohatgi) December 15, 2019
'मोतीलाल नेहरु यांच्यावर व्हिडिओ बनवल्यामुळे राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. हा व्हिडिओ मी गुगलवरुन माहिती मिळवून तयार केला होता. बोलण्याचं स्वातंत्र्य हा विनोद झाला आहे' असं ट्विट केलं होतं, पायलने ट्विटरवर राजस्थान पोलीस, पीएमओ आणि गृहमंत्री कार्यालयाला देखील टॅग केलं होतं.
१० ऑक्टोबर रोजी पोलिसांना पायल विरोधात तक्रार मिळाली होती. काँग्रेस कार्यकर्ता चर्मेश शर्माने पायलविरूद्ध तक्रार दाखल केली होती. नेहरू आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून टिपणी केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.