Poonam Pandey Death News: अभिनयापेक्षा अनेकदा वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा (Poonam Pandey) शुक्रवारी आकस्मिक मृत्यू झाल्याचा दावा दुसऱ्याच दिवशी खोटा ठरला आहे. तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन तिच्या मृत्यूसंदर्भातील माहिती देण्यात आली होती. पूनम पांडेच्या मृत्यूने मनोरजंन क्षेत्रात एकच खळबळ उडाल्याचं सांगितलं होतं. इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे (cervical cancer) तिचा मृत्यू झाला आहे. मात्र पूनमचा खरं मृत्यू झाला आहे की हा प्रसिद्धी झोतात येण्यासाठीचा स्टंट आहे याबद्दल वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात होत्या. या शंका खऱ्या ठरल्यात. पूनमबरोबर काम केलेल्या व्यक्तीने तिचा मृत्यू झाला नसल्याचा दावा यापूर्वीच केला होता.
पूनम पांडेने कंगणा राणौतच्या रिअॅलिटी शो 'लॉकअप'मध्येही काम केलं होतं. पहिल्या पर्वामध्ये पूनम या कार्यक्रमात सहभागी झाली होती त्यावेळी त्याचबरोबर विनीत कक्कडही स्पर्धक म्हणून सहभागी झालेला. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचा मृत्यू सर्वाइकल कॅन्सरमुळे झाल्याचं नमूद करण्यात आलं. ''आजची सकाळ आमच्यासाठी फार कठीण होती. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, आपण पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे गमावलं आहे. या दु:खाच्या काळात, आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी विनंती आहे," असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं. मात्र पूनमचा मृत्यू झाला नसल्याचा दावा तिच्याबरोबर काम केलेल्या विनीत कक्कडने केल्याचं आयएएनएसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
"मी कंगनाच्या धाकड चित्रपटाच्या वेळी 2022 मध्ये आणि नुकताच 'लॉक अप'चे दिग्दर्शकांच्या बर्थ डे पार्टीला पूनमला भेटलो होतो. ही 3 ते 4 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही एकत्र पार्टीही केली. तिला काही गंभीर आजार आहे असं मला कदीच वाटलं नाही. ती अगदी ठणठणीत वाटत होती. तिचा मूडही चांगला होता," असं विनीत कक्कडने म्हटलं आहे.
नक्की पाहा हे फोटो >> स्वत: बनवलेल्या तसल्या App मधून पूनम पांडे कमवायची पैसे! एकूण संपत्ती पाहून बसेल धक्का
"ही खोटी बातमी आहे. काही दिवसांमध्येच तुम्हाला समजेल की बातमी खोटी आहे. सर्वाचे फोन बंद आहेत. कोणीतरी तिचं आणि तिच्या मॅनेजरचं इन्स्टाग्राम अकाऊंट कोणीतरी हॅक केलं असेल. काहीही घडलेलं असू शकतं. मला विश्वास आहे की ही बातमी खरी नाही. सर्वाइकल कॅन्सरसारखा गंभीर आजार तिला झालेला असताना कोणतंही लक्षणं दिसलं नाही यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. हे असं सारं काही अचानक कसं होऊ शकतं?" असा सवाल विनीत कक्कडने उपस्थित केला.
नक्की वाचा >> Cervical Cancer ने घेतला पूनम पांडेचा जीव! महिलांनो 'या' 10 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
विनीत कक्कडने, "हे नेमकं कोण आणि कशासाठी करत आहे मला ठाऊक नाही. कोणी म्हणत आहे की तिचा मृतदेह पुण्यात आहे, कोणी सांगत आहे की मृतदेह कानपूरमध्ये आहे. जोपर्यंत तिचे कुटुंबीय याबद्दल समोर येऊन बोलत नाहीत तोपर्यंत मी या बातमीवर विश्वास ठेवणार नाही. तिच्या कुटुंबातील कोणीही सदस्य सध्या संपर्कात नाही. मी या प्रकरणात इतर कोणावर विश्वास ठेवणार नाही. पूनम तू जिथे कुठे असशील तिथून परत ये आणि तुझ्याबरोबर काय घडलं ते सांग," असंही म्हटलं आहे.