मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ हि मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरले. या मालिकेत येसूबाईंचे पात्र हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत आहे. मालिकेच्या चित्रीकरणासाठी प्राजक्ताने घोडेस्वारीचं आणि तालवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं. चित्रीकरणाच्या १५ दिवस आधी प्राजक्ताला घोडेस्वारीचं योग्य प्रशिक्षण देण्यात आलं, तसेच प्राजक्ता तिच्या लूकटेस्टनंतर जेव्हा पुण्याला गेली तेव्हा तिने जवळपास ८ दिवसातच तालवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं.
तिच्या या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली, "जसं की सर्वांना माहिती आहे की मी साकारत असलेलं येसूबाईंचं पात्र हे घोडेस्वारी आणि तलवारबाजी मध्ये तरबेज आहे, येसूबाईंना या कला फक्त अवगतच नव्हत्या तर त्या त्याच्यात तल्लख होत्या. त्यामुळे माझ्यावर या कला उत्तमप्रकारे छोट्या पडद्यावर साकारण्याची मोठी जबाबदारी होती. तशी मी प्राण्यांना खूप घाबरायचे आणि माझी मालिकेत एन्ट्रीच घोड्यावरून होती. पहिल्या दिवशी जेव्हा मी ट्रेनिंगसाठी गेले तेव्हा मी घोड्याला हात लावायलासुद्धा घाबरत होते कारण ते सर्व घोडे खूप उंच होते पण हळू हळू मी शिकत गेले आणि पहिल्याच सिनमध्ये मी घोडा पळवला. हे घोडे प्रशिक्षित असतात त्यामुळे त्यांना कुठून कुठपर्यंत जायचंय हे माहिती असतं पण इकडे मोकळी जागा दिसल्यावर ते पळत सुटतात अख्क युनिट त्या घोडयांना थांबवण्यासाठी फिल्डिंग लावून असायचं.
तसेच एका सिनमध्ये शंभूराजे आणि येसूबाई रपेटीला आलेले असतात येसूबाई शंभू राजांवर रुसतात आणि त्यामुळे त्या भर वेगाने घोड्यावरून पुढे निघून जातात. त्यावेळी माझ्या घोड्याने आऊट ऑफ द फ्रेम जाऊन त्या संपूर्ण जागेची चक्कर मारली. माझ्या लूकटेस्ट नंतर मी अवघ्या ८ दिवसात तालवारबाजीचे सर्व पैलू शिकले. येसूबाईंचे तलवारबाजी करतानाचे हावभाव, बॉडी लॅंग्वेज हे सर्व हळूहळू शिकत गेले. तलवारबाजी करताना देखील खूप छोट्या छोट्या दुखापती होतात पण संपूर्ण युनिट आमची काळजी घेण्यासाठी तत्पर असतं आणि टेक ओके झाल्यानंतर आम्हाला त्या गोष्टीचा खूप हेवा वाटतो की काहीतरी छान सिन पाहायला मिळणार."