नवी दिल्ली : बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्रा तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग संपवून पती निक जोनाससह वेळ घालवताना दिसत आहे. 'सिटी ऑफ लव' नावाने ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या राजधानीमध्ये प्रियंका आणि निक एकत्र सुट्यांचा आनंद घेत आहेत. निकने प्रियंकासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. निकने शेअर केलेला हा ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निकने इन्स्टाग्रामवर प्रियंका आणि त्याचा एक फोटो शेअर करत त्याला 'सिटी ऑफ लव' असं कॅप्शनही दिलं आहे. या फोटोवर प्रियंकाने एका ईमोजीतून उत्तर दिलं आहे.
पॅरिसमध्ये निकच्या भावाचं लग्न होत आहे. याचंच औचित्त साधून निकचं संपूर्ण कुटुंब 'सिटी ऑफ लव'मध्ये दाखल झालं आहे. निकच्या भावाच्या लग्नापूर्वी कुटुंबासोबतचे निक-प्रियंकाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियंका कामासाठी मुंबईत दाखल झाली होती. त्यानंतर जवळपास एका आठवड्यानंतर ती पुन्हा सासरी पोहचली आहे. प्रियंकाने फरहान अख्तर आणि जायरा वसीमसोबत सोनाली बोस दिग्दर्शित 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. 'द स्काय इज पिंक' येत्या ११ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.