मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा तब्बल तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये भूमिका साकारणार आहे. सोनाली बोस यांच्या 'द स्काय इज पिंक' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सांगायचं झालं तर, 'द स्काय इज पिंक' चित्रपटा आधी ती अभिनेता सलमान खानच्या 'भारत' चित्रपटात झळकणार होती. परंतु गायक निक जोनससोबत लग्न ठरल्यानंतर तिने 'भारत' चित्रपटातून माघार घेतली.
प्रियांकानं अंतिम टप्यात चित्रपटातून माघार घेतल्यामुळे 'भारत'च्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अनेक मुलाखतींमध्ये सलमानच्या तोंडावर प्रियांका प्रती नाराजीचा सूर उमटताना दिसला. त्यामुळे सलमान-प्रियांकामध्ये वाद रंगल्याच्या चर्चा चांगल्याच पसरत होत्या.
परंतु, आता खुद्द प्रियांकाने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई मिररसोबत संवाद साधताना ती म्हणाली की, 'जर मला काही बोलायचं असतं तर मी तेव्हाच बोलली असती. सलमान हा खुप चांगला माणूस आहे. मी नेहमीचं त्याचं कौतुक केलं आहे. सलमानची बहिण अर्पिता माझी खुप चांगली मैत्रीण आहे. माझ्यात आणि सलमानमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही.'
अशाप्रकारे तिने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्याचप्रमाणे सलमान, प्रियांका आणि निकच्या स्वागत सोहळ्यात देखील उपस्थित होता. प्रियांका नंतर अभिनेत्री कतरिना कैफच्या पदरात 'भारत' चित्रपट पडला. त्यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच मजल मारली.